

माणगाव : गेले आठ दिवस कोसळणार्या मान्सूनपूर्व पावसामुळे कर्ली नदी प्रवाहित झाली, सहाजिकच या नदीवर उभारण्यात येणार्या दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिले. दरम्यान पुलाच्या बांंधकामासाठी नदीतून बनविलेलस तात्पुरता रस्ता नदी प्रवाहीत झाल्याने वाहून गेला. सहाजिकच नदी पलिकडील शिवापूर, वसोली, आंजिवडे, दुकानवाड, साकिर्डे या गावांचा रस्ता संपर्क तुटला. याबाबत आ. नीलेश राणे यांनी ठेकेदाराला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यानंतर ठेकेदाराने जुना कॉजवे शनिवारी खुला केला. त्यामुळे सध्या जुन्या कॉजवेवरून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र एसटी सेवा सुरू होणार की नाही याबाबत माहिती समजू शकले नाही.
कुडाळ तालुक्यातील शिवापूर पंचक्रोशीला जोडणार्या पुलाचे बांधकाम दोन महिन्यापूर्वीपासून सुरू केले होते. ठेकेदाराने युद्धपातळीवर बांधकाम केले. मात्र अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे कर्ली नदी पूर्ण प्रवाहित झाली, त्यामुळे पुलाच्या बांधकामाला मोठा अडथळा निर्माण झाल्याने ठेकेदारला काम थांबवावे लागले.
नवीन पुलाचे काम अर्धवट राहिले तर जुना कॉजवे भरावाखाली गेला. यातच कर्ली नदी प्रवाहित झाल्यामुळे शिवापूरकडे जाणार्या एसटी बसेस बंद झाल्या. परिणामी नागरिकांची पायपीट सुरू झाली. याची दखल घेत ठेकेदाराने तात्काळ जुन्या कॉजवेवरील भराव बाजूला करून कॉजवे वरून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे आता जुन्या कॉजवेवरून वाहतूक सुरू झाली आहे. पण एसटी बसेस अद्यापही सुरू न झाल्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
दुकानवाड येथे बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम पावसामुळे अर्धवट राहिले. त्यामुळे शिवापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. जुना कॉजवे गाळाने भरला होता, परिणामी वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती.याची दखल घेत आ.नीलेश राणे यांनी जुना कॉजवे मोकळा करून वाहतुकीस योग्य करा अशा सूचना बांधकाम विभागाला दिल्या, त्यानंतर बांधकाम विभाग व ठेकेदारांची सर्व यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली आणि जुना वापरता असलेला कॉजवे वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. या भागातील विजेचा ही प्रश्न सोडविण्यात आला. मोबाईल टॉवरची रेंज पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली. याबद्दल शिवापूर पंचक्रोशीतील जनतेकडून आ. नीलेश राणे यांचे आभार मानले जात आहेत.