Karivade dam accident : कारिवडे धरणात बुडून मुलाचा मृत्यू; धक्क्याने वडिलांचाही गेला प्राण!

सावंतवाडीतील घटना: मानसिक धक्का बसल्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका
Karivade dam drowning incident
क्रिश सावियो आणि वडील सावियो आग्नेल संभया.pudhari photo
Published on
Updated on

सावंतवाडी ःकारिवडे - पेडवेवाडी धरणावर मित्रांसोबत फिरायला गेलेल्या क्रिश सावियो संभया (वय 19, रा.सालईवाडा) हा युवक तोल जाऊन धरणाच्या जलाशयात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. घडली. दरम्यान, मुलाच्या या अपघाती मृत्यूची बातमी ऐकताच त्याचे वडील सावियो आग्नेल संभया (48) यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तत्काळ रुणालयात दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मुलापाठोपाठ वडिलांचेही निधन झाल्याने संभया कुटुंबीय पुरत कोलमडून गेले आहे. क्रिश हा मंगळवारी सायंकाळी मित्रांसोबत कारिवडे धरणावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व धरणाच्या जलाशात बुडाला. मित्रांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यातही कल्पना देण्यात आली. अखेर सायं 7 वा. बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत धरणाच्या जलाशयात शोधमोहीम राबवली. अखेर रात्री 11 वा. च्या सुमारास मृतदेह पाण्यावर तरंगत आला. तो मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुलगा धरणात बुडाल्याचे वृत्त ऐकून क्रिशचे वडील श्री.सावियो यांना जबर मानसिक धक्का बसला. मंगळवार रात्रभर ते या धक्क्यातच होते. त्यातच बुधवारी पहाटे त्यांना हृदयविकारचा धक्का बसल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी त्यांना स. 6 वा. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ‘सामाजिक बांधिलकी’ प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी तातडीने आरोग्य यंत्रणा हलवली. ऑन-कॉल ड्युटी बजावत असलेले डॉ. अभिजित चितारी काही मिनिटांतच रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी सावियो संभया यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु, उपचारादरम्यानच बुधवारी दुपारी 12 वा. त्यांचे रुग्णालयात निधन झाले.

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचेही निधन झाल्याच्या या हृदयद्रावक घटनेमुळे संभया परिवार, मित्रमंडळांवर शोककळा पसरली आहे. एका क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. क्रिश संभया हा या वर्षीच सावंतवाडीतील मिलाग्रीस ज्युनि. कॉलेजमधून बारावी(विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पुढील उच्च शिक्षणासाठी तो लवकरच प्रवेश घेणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. त्याचे वडील सावियो हे दूध विक्रीचा व्यवसाय करत. त्याच्या पश्चात आई, भाऊ,आजी, आजोबा असा परिवार आहे.

प्राणज्योत मालवली....

मुलगा धरणात बुडाल्याची बातमी ऐकून सावियो यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांना बुधवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news