

कणकवली : कणकवली तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सोळा पंचायत समिती मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 43 उमेदवारी अर्जांची तर शनिवारी 17 उमदेवारी अर्जांची विक्री झाली. शनिवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. रविवार सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे सोमवार 19 जानेवारीपासूनच उमदेवारी अर्ज प्रत्यक्षात दाखल करण्यात सुरुवात होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
कणकवली तालुक्यात 135 मतदान केंद्र असून कणकवली तहसील कार्यालयातच ईव्हीएम पेट्या ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम आणि मतमोजणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कात कर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्याची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार, शनिवारी उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र, अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. परंतु सोमवारपासून अर्ज दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करताना जि. प. निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला 1 हजार रुपये, तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. तर पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना सातशे रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. 21 जानेवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून दुसऱ्या दिवशी अर्जांची छाननी होणार आहे. 27 जानेवारीला चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.