

कणकवली : महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र ओसरगाव येथील पोलिसांनी गुरुवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास सावंतवाडी येथून चोरीस गेलेली मोटरसायकल महामार्गावर सावडाव येथे पाठलाग करून पकडली. पोलिस पाठलाग करत असल्याचे पाहताच चोरट्याने मोटरसायकल सावडाव येथे हायवेवर टाकून हॉटेल आशिष मागील जंगलमय भागात पळून गेला.
महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक सुनील हेरूगडे यांच्या सुचनेनूसार हवालदार राजेश ठाकूर व पोलिस कॉन्स्टेबल महादेव सापळे सावडाव येथे महामार्गावर अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे भंग करणार्या वाहनांवर कारवाई करत होते. त्याचवेळी कणकवलीहून नांदगावच्या दिशेने विना हेल्मेट आणि मोबाईलवर संभाषण करत जाताना एक मोटरसायकलस्वार दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो नांदगावच्या दिशेने सुसाट पळून गेला.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी लागलीच मोटरसायकलचा पाठलाग केला. त्यावेळी चोरटा हॉटेल आशिषच्या नजिक मोटरसायकल रस्त्यावर टाकून जंगलात पळून गेला. मोटरसायकल नंबरवरून त्या मोटरसायकल मालकाचे नाव पास्कू राड्रिग्ज असल्याचे दिसून आले. त्याच्याशी संपर्क साधला असता ती मोटरसायकल चोरीस गेल्याचे त्यांनी सांगितले.
बुधवारी तशी तक्रार त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिल्याचे सांगितले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली मोटरसायकल सापडली.