

कणकवली : कणकवली तालुक्यात शनिवार (दि.९)झालेल्या वादळी पावसामूळे घरांवर झाडे पडून, पत्रा शेड उडून जावून घरे, गोठे, दुकाने, पोल्ट्री, समाजमंदिर, अंगणवाडी यांचे ५४ लाख २२ हजार ५६६ रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने दोन दिवस पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे.
शनिवारी झालेल्या चक्रीवादळ सदृश्य वादळाचा फटका कणकवली शहर, हरकुळ बुद्रुक, नागवे, जानवली, साकेडी, डामरे, कोंडये, दारूम, खारेपाटण, नडगिवे, वायंगणी, चिंचवली, कुरंगवणे, वारंगाव, उत्तर दक्षिण गावठण, उत्तमनगर, श्रीनगर, पिंपळेश्वर नगर, राजनगर, लिंगेश्वरनगर, दारिस्ते, शिवडाव, करंजे या गावांना बसला आहे. खारेपाटणमध्ये सर्वाधिक १७९ घरांचे अंशता तर एका घराचे पूर्णतः नुकसान झाले. कणकवली शहरातील एका कापड दुकानाचे १ लाख ७५ हजारांचे नुकसान झाले आहे.
कणकवली तालुक्यातील अनेक शाळा, अंगणवाड्या, समाजमंदिर आणि आश्रम शाळांचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात करंजे येथील तीन शाळांच्या नुकसानीचा आकडा ३ लाख ५२ हजारांच्या घरात आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे गोठे कोसळले असून चिंचवली येथील पोल्ट्री फार्मचेही १८ हजारांचे नुकसान झाले आहे.
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हे पंचनामे केले आहेत. खारेपाटणमधील इमारतींवरील पत्रा शेड उडाल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. हा नुकसानीचा अंतिम अहवाल आता जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी पाठवण्यात आला आहे.