

कणकवली : कणकवली शहरवासीयांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत. ज्या सभागृहात शहराच्या विकासाचे आणि लोकहिताचे निर्णय होतात, त्या कणकवली नगरपंचायतीच्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहाचे अद्यावत स्वरूपात नूतनीकरण करण्यात आले आहे. हे केवळ चार भिंतीचे सभागृह नाही तर कणकवलीच्या उद्याच्या भविष्याचे निर्णय या सभागृहातून होणार आहेत .जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवून सत्ता दिली तो विश्वास निश्चितपणे सार्थकी ठरवला जाईल. कणकवलीकरांच्या विकासाची स्वप्ने, निश्चितपणे पूर्ण केली जातील अशी ग्वाही नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सभागृह उद्घाटन प्रसंगी दिली .
कणकवली नगरपंचायतीच्या नूतनीकरण केलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहाचे तसेच इमारत परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, बाळू पारकर, लूकेश कांबळे, नगरसेविका सुमेधा अंधारी,जाई मुरकर, दीपिका जाधव तसेच कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह नागरिक, न .प .कर्मचारी उपस्थित होते. संदेश पारकर म्हणाले, हे चार भिंतीचं सभागृह नाही, याच्यामध्ये जनतेचा जो आवाज आहे, लोकांच्या ज्या मागण्या आहेत, लोकांना जो न्याय द्यायचा आहे, सकारात्मक दृष्ट्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन तशा पद्धतीनं हा सगळा कारभार आपल्याला त्याठिकाणी करायचा आहे. खरंतर, नगरपालिकेचं जे प्रशासन आहे,
या माध्यमातून लोकहिताचे निर्णय झाले पाहिजेत, चांगल्या प्रकारे या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे .मूलभूत सुविधांच्या बरोबर शाश्वत विकासाची सुद्धा जबाबदारी ही त्या निमित्ताने आमची आहे. आणि म्हणून दहा महिन्यामध्ये आम्ही काय काम केलं हे २१ डिसेंबरला जनतेसमोर ठेवणार आहोत. नेमकं प्रशासनाचं कामकाज कसं चालतं, सभागृह कसं चालतं, कुठं पत्रकार बसतात, कुठं नगरपालिकेचे प्रशासन बसतं आणि कसं त्याठिकाणी नगरसेवक याठिकाणी बसून आपली भूमिका, आपले प्रश्न त्या-त्या वॉर्डातले, शहरातले कशा पद्धतीनं मांडतात हे दाखवण्यासाठी शहरवासीयांना निमंत्रण निमंत्रित केले.
एक नवं दालन त्यानिमित्तानं उभं केलेलं आहे. प्रशासकीय कामे गतीने व्हावीत हा आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊया आणि शहराच्या विकासाला न्याय देऊया . विकसित कणकवली, स्वच्छ सुंदर कणकवली बनवूया अशी ग्वाही संदेश पारकर यांनी यावेळी दिली. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनीही नूतनीकरण केलेल्या या सभागृहातून शहर विकासाचे ,लोकहिताचे अनेक निर्णय पुढील काळात घेतले जातील अशी ग्वाही दिली.