

कणकवली ः कणकवली-कनकनगर येथील समृद्धी मिलिंद कोरगावकर यांचे बंद घर फोडून सुमारे सात लाखाचे दागिने चोरणार्या चोरट्यास एलसीबी व कणकवली पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार पणजी मार्केट येथील बस थांब्याजवळ जेरबंद केले. त्याच्याकडून सहा लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. संतोष वसंत सुतार (47, रा. आंबव पोंक्षे, संगमेश्वर) असे या चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
कणकवलीत एका पाठोपाठ एक चोर्यांच्या घटना घडत होत्या, त्यामुळे पोलिस यंत्रणेसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतू गुन्हा घडल्यापासून 16 तासात आरोपीचा छडा लावण्यात यश आल्याने पोलिस यंत्रणेनेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेल्या आठवड्यात कणकवली पोलिस स्टेशनपासून अवघ्या दोन कि.मी. वर असलेल्या कलमठमध्ये घरफोडीची घटना घडली होती. त्या घटनेला चार दिवस उलटतात न उलटताच तोच कणकवली कनकनगरमधील समृद्धी कोरगावकर यांचे बंद घर चोरट्याने फोडून कपाटातील साडे सहा तोळे सोन्याचे दागिने, मुलांची चांदीची साखळी व देव्हार्यातील गणपतीची चांदीची मुर्ती असा मिळून सुमारे 7 लाखाचा ऐवज लंपास केला होता.
दरम्यान चोरट्याने शनिवारी रात्री सवा अकराच्या सुमारास श्री. कोरगावकर यांच्या घराच्या नजीक असलेल्या एका बिल्डिंगच्या खाली जावून टेहळणी केली होती. त्यावेळी तो हातात सळी घेवून चड्डी बनियनवर बिल्डिंगच्या कार पार्किंग जागेत फिरताना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजवरून कणकवली पोलिस आणि एलसीबी पोलिस यांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला.
दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार संशयित चोरटा संतोष सुतार हा गो-डॅडी कसिनो पणजी मार्केट परिसरात असल्याचे समजले होते. त्यांचा शोध सुरू असताना सोमवारी सकाळी 11 ते 12 वा. च्या सुमारास पणजी मार्केटजवळ बसस्टॉपजवळ तो दिसून आला. त्याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे काळ्या रंगाच्या पिशवीत सौ. कोरगावकर यांचे सुमारे 6 लाखाचे दागिने, चांदीची गणेशमुर्ती असा ऐवज आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला कणकवली पोलिस ठाण्यात आणले. संशयित आरोपी संतोष सुतार हा गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात वावरत होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोर्यांचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा अन्य चोर्यांमध्ये काही सहभाग आहे का? याचाही तपास आता पोलिस करणार आहेत.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवल्याने चोरट्याच्या मुसक्या आवळयात आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. सदरची कारवाई सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर, अतिरिक्त पोलिस निरीक्षक कृषिकेश रावले, एलसीबीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवलीचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, समीर भोसले, आर. बी. शेळके, पोलिस हवालदार डॉम्निक डिसोजा, जॅक्सन घोन्सालवीस, पांडुरंग पांढरे, आशिष जामदार यांच्या पथकाने केली.
कणकवली घरफोडीतील चोरट्याच्या 16 तासात मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्थात सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा चेहरा दिसल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. कणकवली शहरामध्ये पोलिस यंत्रणेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती तसेच अँगलही तपासणे आवश्यक आहे. तसेच शहरातील बिल्डिंग धारकांनीही सुरक्षेचा उपाय म्हणून सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे. बाजारपेठेतही सीसीटीव्ही कॅमेर्यांची तेवढीच आवश्यकता आहे.