

कणकवली : कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या चार महिन्यांत कणकवली शहर ‘स्वच्छ आणि सुंदर’ बनवण्यासाठी नं.प.च्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून कणकवली नगरपंचायतीने शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे. येत्या ८ दिवसांत कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे. कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही कटू निर्णय घ्यावे लागतील मात्र शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे निर्णय आवश्यक आहेत यासाठी नागरिक, व्यापारी यांनी सहकार्य करावे असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
कणकवली न.पं.मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संदेश पारकर बोलत होते. नगरसेवक बाळू पारकर उपस्थित होते. कणकवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, फूटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि विस्कळीत बाजार व्यवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांसह पत्रकारांकडूनही सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विषयांचा अभ्यास करण्यात आला आहे.
कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख शहर असून येथे शिक्षण, व्यापार, धार्मिक स्थळे आणि विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते तसेच इतर लहान-मोठे व्यावसायिक रस्ते, फूटपाथ आणि महामार्गालगत व्यवसाय मांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीकडून शहरातील उड्डाणपुलाखाली रिक्षा स्टँड, टेम्पो, ट्रक वाहतूक, खासगी बस, पार्किंग व्यवस्था आणि व्यापाऱ्यांचा तपशीलवार डेटा संकलित करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
शिस्तीशिवाय शहराचा विकास शक्य नाही. नाका चौक ते पोलिस ठाणे, जानवली पुलापर्यंतचा परिसर, नाका चौक ते गडनदी परिसर, बाजारपेठ, भालचंद्र महाराज मठाकडे जाणारा रोड आणि डीपी रोड, कॉलेज रोड या भागांमध्ये अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवली जाणार आहे. फूटपाथवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगराध्यक्ष संदश पारकर यांनी दिला.
सुमारे २५ वर्षांपूर्वी महामार्गालगत भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली होती. मात्र आता वाहतूक वाढल्याने नवीन पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. डीपी रोडवरील नवीन भाजी मार्केटचे बांधकाम पूर्ण झाले असून ते लवकरच अपूर्ण कामे पूर्ण केल्यानंतर हे भाजी मार्केट सुरू केले जाणार आहे. जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे. त्याठिकाणी असलेल्या गाळे धारकांचे पुनर्वसन केले जाईल.
बाजार करामध्ये वाढ करणार
उड्डाणपुलाखाली मोठ्या जागा वापर करुन व्यवसाय करणार्या व्यापार्यांकडून नगरपंचायतच्या उत्पन्न वाढीसाठी बाजार करामध्ये वाढ केली जाणार आहे. जागेनुसार आकारणी करण्यात येणार आहे. शहरातील खासगी बस, रस्त्यावर उभी राहणारी वाहने, चाकरमान्यांची बेफिकीर पार्किंग, दुकानांसमोर उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी यामुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे नमूद करत पोलिस प्रशासनाने अधिक कडक भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शहरात सिग्नल यंत्रणाही उभारण्यात येणार असून, स्वच्छ आणि सुंदर कणकवलीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन संदेश पारकर यांनी केले .
आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे शहरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही, आपली कणकवली स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली ठेवण्यासाठी व्यापारी व व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन संदेश पारकर यांनी केले. कणकवली उड्डाण पुलाखालील ४४ पिलर परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी व वाहनतळ तयार झाले आहेत. त्याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या परिसराचे सुशोभीकरण करून १८०० मीटर लांबीचा विकसित पट्टा उभारण्याचा मानस नगरपंचायतीचा आहे. श्रीधर नाईक चौकापासून या सुशोभीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात श्रीधर नाईक चौक ते प्रांत कार्यालय या भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून जॉगिंग ट्रॅक करण्यात येणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार आकर्षक पध्दतीने हा परिसर विकसित केला जाणार असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले.
कणकवली शहरातील अनेक भागांमध्ये नगरपंचायतीची परवानगी न घेता फ्लेक्स उभे केले जातात. हे फ्लेक्स अनेक दिवस तसेच उभे असतात याबाबत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगताना संदेश पारकर म्हणाले, प्लास्टिक बंदीसाठी व्यापारी यांना सूचना दिली जाणार आहे आणि सूचनेचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, असे संदेश पारकर यांनी सांगितले.