

कणकवली ः काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेत झालेल्या घोळाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते; मात्र त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणे आवश्यक असताना भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री आणि भाजपने का दिली? असा सवाल करत मतदान प्रक्रियेत झालेल्या चुकीच्या गोष्टींबाबत काँगे्रसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवार 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वा. काँग्रेसतर्फे कणकवलीत ‘मशाल यात्रा’ काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली.
कणकवलीतील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होेते. काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रवीण वरूणकर, सरचिटणीस व्ही. के. सावंत, तालुका उपाध्यक्ष आयशा सय्यद, संजय राणे, प्रदीप जाधव, बाबा काझी आदी उपस्थित होते.
इर्शाद शेख म्हणाले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीबाबतच प्रश्न उपस्थित केले नाहीत तर लोकसभेवेळीही उपस्थित केले होेते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान प्रक्रियेत घोळ घालण्यात आला. त्यामुळे निवडणूक आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित होते. मात्र निवडणूक आयोगाने ती दिली नाहीत. उलट भाजपने थातूरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
उदा. कामठी लोकसभा मतदारसंघात मविआ उमेदवाराला 1 लाख 36 हजार मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 1 लाख 19 हजार मते मिळाली. तर पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली असता काँग्रेस उमेदवाराला 1 लाख 34 हजार मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 1 लाख 75 हजार मतदान झाले. यावरून त्याठीकाणी पाच महिन्यात मतदारांची संख्या वाढली व लोकसभेत न केलेल्या मतदारांनी विधानसभेत मतदान भाजपलाच केले असे समजायचे का? याची शहानिशा व्हायला हवी, असे इर्शाद शेख म्हणाले.
वाढलेल्या मतदानाचे व्हिडीओ फुटेज काँग्रेसने मागितले होते. त्याला आयोगाने नकार दिला. सरकारने तर कायदाच बदलला. त्यामुळे महाराष्ट्रात नियोजनबध्द मतदान घोटाळा झाला. केंद्रिय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करताना देखील पक्षपातीपणा करण्यात आला. जर ‘कर नाही त्याला डर कशाला’? असा सवाल इर्शाद शेख यांनी केला. त्यामुळे हा सारा प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मशाल यात्रा’ आयोजित केल्याचे इर्शाद शेख यांनी सांगितले.
ही मशाल यात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सुरू होऊन पटवर्धन चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढली जाणार आहे. या ‘मशाल यात्रे’त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, त्याचबरोबर ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, ज्यांना लोकशाही बळकट व्हावी असे वाटत आहे, संविधानाप्रति ज्यांना आदर आहे अशा सर्व नागरिकांनीही या ‘मशाल यात्रे’त सहभागी व्हावे, असे आवाहन इर्शाद शेख यांनी केले आहे.