Sushant Dalvi murder case : बंदुकीची गोळी अनावधानाने फायर झाली!

संशयित अमर कदमकडून खुनाची कबुली ः सात दिवसांची पोलिस कोठडी
Sushant Dalvi murder case
संशयित आरोपी अमर कदम
Published on
Updated on

कणकवली : कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी (वय 38) यांच्या खूनप्रकरणी अटक आरोपी अमर सत्यवान कदम (19, रा. वर्देरोड, डोंगरेवाडी) याने सुशांत समवेत आपण शिकारीला गेलो असताना ज्या ठिकाणी सुशांतचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शिकार दिसली आणि आपल्या हातातील बंदुकीची गोळी अनावधानाने फायर झाली, ती सुशांतला लागल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. संशयित अमर कदम याला शनिवारी दुपारनंतर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती पाटील यांनी त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याने गुन्ह्यात वापरलेली सिंगल बॅरेलची बंदुक पोलिसांनी नरडवे नाका येथील सुशांत दळवी यांच्या साईटवरुन जप्त केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा कणकवलीचे पोलिस निरिक्षक तेजस नलवडे यांनी दिली.

सुशांत दळवी खून प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आणि पोलिसांनी या प्रकरणी त्यांचा मुकादम अमर कदम याला कणकवलीतून ताब्यात घेवून चौकशीअंती अटक केली होती. या गुन्ह्यात अमर सोबत आणखी कोणी साथीदार होते का?, सुशांत दळवी यांचा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला?, आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाला की अन्य कोणते कारण आहे ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले होते. पोलिसांच्या तपासात अमर कदम याने खूनाची कबुली देत घटनाक्रम सांगितला.

यामाहा मोटरसायकलने शिकारीसाठी बाहेर पडले

गुरुवारी रात्री 11.30 ते 12 वा. च्या सुमारास सुशांत दळवी आणि अमर कदम शिकारीसाठी कणकवलीतून बाहेर पडले. यामाहा मोटरसायकल स्वतः सुशांत दळवी चालवत होते तर त्याच्या मागे सिंगल बॅरेलची बंदुक घेवून अमर कदम बसला होता. शिकारीसाठी ते थेट नरडवे रोडने मुडेश्वर मैदानाच्या दिशेने गेले. मोहनमळा परिसरात ते गेल्यानंतर त्यांनी मोटरसायकल थांबवली. त्या दरम्यान त्यांना शिकार दिसली. त्यावेळी त्याच्याकडून बंदुकीची गोळी अनावधानाने फायर झाली आणि ती सुशांत यांना लागल्याचे अमर कदम याने सांगितले. मात्र त्यानंतर मृतदेह 25 ते 30 फूट ओढत नेवून का टाकला? अनावधानाने जर गोळी लागली तर त्याने कणकवलीत सुशांत यांच्या घरी किंवा मित्र परिवाराला माहिती का दिली नाही? असे अनेक संशय निर्माण करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेनंतर येऊन अमर साईटवर झोपला

सुशांत दळवी यांच्यावर गोळी झाडल्यानंतर मुकादम अमर कदम हा यामाहा मोटरसायकल घेवून कणकवलीत आला. त्यानंतर नरडवे नाका येथील सुशांत दळवी यांच्या साईटकडे मोटरसायकल लावून तेथेच झोपला. मात्र त्याच्यासोबत अन्य कोणी होते का? हे स्पष्ट झालेले नाही.

बंदूक विनापरवाना ः तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे

सुशांत दळवी यांच्या कपाळाला डाव्या डोळ्याच्यावर एक जखम होती तर मानेच्या मागच्या बाजूला गोळी लागल्याची खुणा आहे. मात्र त्याने किती गोळ्या झाडल्या हे स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी सुशांत यांचा मृतदेह विच्छेदनाकरीता कोल्हापूर सीपीआर येथे पाठवण्यात आला होता. त्यांचा पीएम रिपोर्ट अद्याप आलेला नसल्याचे तपासी अधिकारी तेजस नलवडे यांनी सांगितले. या गुन्ह्यात वापरलेली सिंगल बॅरेलची बंदुक पोलिसांनी अमर कदम राहत असलेल्या नरडवे नाका येथील साईटवरुन जप्त केली. ती सुमारे 20 हजार रुपये किमतीची असून 47 सेमी लांबीची आहे. ही बंदुक विनापरवाना असून ती तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे देण्यात आली आहे. मृतदेह विच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील बंदुक, यामाहा मोटारसायकल आणि अमर कदम याचे रक्त लागलेले कपडे जप्त केले आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून अमर कदम सुशांतकडे कामाला

या गुन्ह्यातील आरोपी अमर कदम हा गेल्या तीन वर्षापासून सुशांत दळवी यांच्याकडे कामाला होता. नरडवे नाका येथील साईटवर तो राहत असे. सुशांत आणि अमर कदम अनेकदा यापूर्वी शिकारीला गेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. एलसीबीच्या पोलिस टिमने शुक्रवारी सकाळी 10 वा.च्या सुमारास त्याला कणकवलीतील साईटवरुन ताब्यात घेतले होते. चौकशीअंती सुशांत यांच्यावर अमर यानेच गोळी झाडल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानुसार त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अन्य कोणी साथीदार होते का?

या गुन्ह्यात अमर कदम याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने अनावधानाने बंदुक फायर झाल्याची कबुली देत या घटनेवेळी आपण एकटाच होतो असे सांगितले असले तरी या गुन्ह्यात आणखी कोणी साथीदार होते का? अमर ला पुढे करून कोणी सुशांत दळवी यांचा काटा काढला का? या अनेक प्रश्नांचा तपास पोलिस करत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news