

कणकवली : कणकवलीतील बांधकाम व्यवसायिक सुशांत जर्नादन दळवी (३८, रा. कळसुली) यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला त्यांचा मॅनेजर अमर कदम हा ते दोघेही शिकारीला गेले असताना आपल्या हातून अनावधानाने बंदुकीचा चाप ओढला गेला आणि गोळी फायर झाली, त्यात सुशांत यांचा मृत्यू झाल्याचे तो सांगत असला तरी शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच सुशांत यांना गोळी नेमकी कशी लागली? हे स्पष्ट होणार आहे. सध्या त्यांचा मोबाईल सिडीआर, एसडीआर आणि सिसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सूरू असल्याचे तपासी अधिकारी तथा कणकवलीचे पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सांगितले.
सुशांत दळवी यांच्या गोळी लागून झालेल्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. त्या दृष्टीने पोलिस नेमके वास्तव काय आहे? याचा तपास करत आहेत. सुशांत यांना शिकारीचा छंद होता. घटना घडली त्या रात्री ते त्यांचा मॅनेजर अमर कदम याला सोबत घेवून मोटरसायकलने शिकारीसाठी घरातून सांगून बाहेर पडले होते. त्या रात्री मोटरसायकलवरून जात असताना आपल्या हातात सिंगल बॅरेलची बंदूक होती. शिकार दिसल्याने बंदूक लोड करून ठेवण्यात आली होती.
अनावधानाने चाप ओढला गेला आणि फायर झाली ती गोळी सुशांत यांना लागून त्यांचा मृत्यू झाला असे संशयित आरोपी अमर कदम याचे म्हणणे आहे. पण त्याने ठेवली ? सुशांत यांचे चप्पल झाडावर भिरकावून का दिले? त्यांचा मृतदेह २५ ते ३० फूट फरफटत का नेला? त्यांच्या सोबत आणखी कोणी होते का? या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरीत आहेत. केवळ आरोपी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवून थांबणार नाही तर वस्तूस्थिती काय आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. अर्थात
सिपीआरच्या शवविच्छेदन अहवालानंतरच अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. सुशांत याला लागलेली बंदुकीची गोळी एकच आहे की आणखी गोळ्या लागल्या होत्या, त्यांच्या मानेवर मागून जी गोळी लागली तीच गोळी डाव्या डोळ्याच्या वरून बाहेर पडली आहे का? या सर्व बाबी त्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहेत. तसेच बंदूक फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली असून या बंदुकीतून नेमक्या किती गोळ्या फायर झाल्या? हे ही स्पष्ट होणार आहे. त्याच बरोबर घटना घडली त्या अगोदर आणि नंतरचे सुशांत दळवी व संशयित अमर कदम यांचे मोबाईल सिडीआर तपासले जात आहेत. त्याच बरोबर त्यांचे सिसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याचे तपासी अधिकारी तेजस नलवडे यांनी सांगितले.