

कणकवली : गोवा राज्यातून साडेतीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली परंतु पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल नसलेली यामाहा फॅसिनो दुचाकी राष्ट्रीय महामार्ग केंद्र ओसरगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या चौकस कर्तव्यदक्षतेमुळे रविवारी गाडी मालकाला परत मिळाली.
कणकवली तालुक्यातील नाईक पेट्रोल पंप वागदेच्या आवारात एप्रिल 2025 पासून यामाहा स्कूटर बेवारस स्थितीत उभी केलेली होती. पेट्रोल पंपावरील कर्मचारी अक्षय मेस्त्री याने महामार्ग पोलिस केंद्र ओसरगाव येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांना ही घटना कळविली. गवस यांनी घटनास्थळी जात गाडी क्रमांकावरून शोध घेतला असता सदर स्कूटर गोवा राज्यातील लेक्स घोंसालवीस यांच्या मालकीची असल्याचे समजले.
तात्काळ आरटीओ रजिस्ट्रेशन वेळी रजिस्टर असलेल्या मोबाईलवर स्कुटर मालक लेक्स घोंसालवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ती स्कूटर चोरीस गेलेली होती. परंतु त्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल नव्हती, घोंसालवीस यांनी पणजी पोलिस ठाण्यात गाडीबाबत केवळ पत्र दिलेले होते. ए एस आय गवस यांनी पणजी गोवा पोलिस ठाण्यात संपर्क साधून ती स्कूटर मालक घोंसालवीस यांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग केंद्र ओसरगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी महामार्ग वाहतूक पोलिस अंमलदार यांना चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याबाबतच्या वारंवार सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ए एस आय गवस यांनी आज कारवाई केली. स्कूटर मालक लेक्स घोंसालवीस यांनी महामार्ग पोलिसांचे आभार मानले. यावेळी महामार्ग वाहतूक पोलिस अंमलदार एकनाथ सरमळकर, योगेश लाड, नितीन शेट्ये, रवि इंगळे, सागर परब आदी उपस्थित होते.