

कणकवली : ‘लाल आला तुरा गुलमोहरा, हाच प्रीतीचा पहिला इशारा...’ असे यथार्थ वर्णन कवीनी ज्या वृक्षाचे केले आहे, असा गुलमोहराचा वृक्ष सध्या वैशाख वणव्यातही फुलांनी बहरला आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या दुतर्फा केशरी लालबुंद फुलांनी बहरलेले गुलमोहर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. झाडाच्या शेंड्यापासून बुंध्यापर्यंत केवळ लाल केशरी रंगाची उधळण पाहायला मिळत असून ऐन उन्हाळ्यातही हा केशरी अल्हाददायक नजारा डोळ्यांना सूखावत आहे.
उन्हाळ्याच्या काहीलीवर फुंकर घालणारा हा लालबुंद गुलमोहर आणखी महिनाभर डोळे आणि मन तृप्त करणार आहे. खरेतर गुलमोहर हे झाड विदेशी. परंतू सावली आणि सौदर्यासाठी फारच उपयुक्त आहे. मार्च, एप्रिलमध्ये पिवळ्या फुलांचे गुलमोहर बहरतात तर जशजशी पावसाळ्याची ओढ लागते तसतसे मे महिन्यापासून लालबुंद केशरी गुलमोहर बहरतात. शाळा, कॉलेजचा परिसर, सरकारी कार्यालये आणि रस्ता दुतर्फा सध्या या गुलमोहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महामार्गापासून अनेक ग्रामीण रस्त्यावर सध्या या बहरलेल्या केशरी गुलमोहरांमूळे रस्त्यांनी जणू भगवी शालच पांघरल्याचे दिसते. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. मात्र या कडक उन्हाच्या झळांमध्येही केशरी गुलमोहराचा हा नजारा मन प्रसन्न करतो. शेवटी निसर्गच हाच खरा चित्रकार आहे हेच यातून अधोरेखित होते.