

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरूध्द ठाकलेले जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे व शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत हे रविवारी एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वर्धापन दिनाचे. या सोहळ्याच्या निमित्ताने नितेश राणे व सतीश सावंत यांच्या मध्ये गप्पाही सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे कार्यक्रम शिक्षण संस्थेचा असला तरी त्यावरून राजकीय चर्चांना मात्र उधान आला होता.
वर्धापन दिन सोहळ्यात अध्यक्षीय भाषण करताना सतीश सावंत यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात नारायण राणे यांनी संस्थेला उपलब्ध करून दिलेल्या भरघोस निधीची आठवण करून दिली. त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या समस्याही त्यांनी मांडल्या. तर आपल्या भाषणाला सुरूवात करताना नितेश राणे म्हणाले, आज व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर हा कार्यक्रम 2019 पूर्वीचा तर नाही ना? असे काहींना वाटले असेल असे सांगत कार्यक्रमात रंगत वाढवली. शिक्षणसंस्थांसाठी आपण राजकीय विरोध बाजुला ठेवून एकत्रित काम करणे गरजेचे आहे. दर्जेदार शिक्षण देणे ही सर्वार्ंचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ते बक्षीस वितरण, गुणवंतांचा गौरव अशा एकुणच कार्यक्रमात अधून मधून नितेश राणे व सतीश सावंत यांच्यामध्ये होणारा संवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे नेते सतीश सावंत म्हणाले, हा शैक्षणिक कार्यक्रम आहे आणि त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे या विषयात राजकारणाचा अथवा एकत्र येण्याचा विषय मुळात येतच नाही. त्यामुळे कुणी वेगळी चर्चा करून या या भेटीचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया दिली.
कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयी ना. नितेश राणे यांना विचारणा केली असता आपण कुणाला शत्रू मानत नाही तर प्रतिस्पर्धी समजतो,त्यामुळे शैक्षणिक, शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत आपण कुणासोबतही बोलू शकतो त्यात राजकारण येथे कुठे, असा सवाल केला आहे.