

कणकवली : कणकवलीतील भालचंद्र ज्वेलर्स या सोने, चांदी दुकानातील धाडशी चोरीप्रकरणी चोरट्यांचा छडा लावण्याप्रकरणी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. पुणे येथे एका घरफोडीमध्ये पाच पैकी एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे. त्यामुळे कणकवलीतील चोरीत त्या चोरट्याचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्यासाठी कणकवली पोलिसांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे. दरम्यान एका चोरट्याचे ठसेही पोलिसांच्या हाती लागले असून त्या अनुषंगाने हिस्ट्रीसीटरवरील चोरट्यांचा तपास केला जात आहे.
कणकवली पोलिस स्टेशनपासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या भालचंद्र ज्वेलर्स या दुकानात बुधवारी पहाटे चोरट्यांनी चोरी करत सोने, चांदीचे व बँटेक्सचे दागिने मिळून सुमारे सव्वादहा लाखाचा ऐवज चोरला. त्यामुळे पोलिसांसह एलसीबी आणि इतर पोलिस यंत्रणाही चोरट्यांचा माग काढण्यासाठी कामाला लागली आहे. कणकवलीतील चोरीत सीसीटीव्ही कॅमेर्यात चार चोरटे कैद झाले होते. त्यामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, पुणे व आसपासच्या भागातील हिस्ट्रीसीटरवरील चोरट्यांचा पोलिस तपास करत आहेत. कणकवलीतील चोरीत एका चोरट्याचे अंगठ्याचे ठसे सापडले आहेत, त्या अनुषंगानेही तपास केला जात आहे. सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेजही तपासले जात आहे. कणकवली पोलिस व एलसीबी संयुक्तपणे या चोरीचा तपास करत आहेत.
कणकवली शहरात झालेल्या ज्वेलर्स दुकानातील चोरीच्या अनुषंगाने नागरिकांनी संकटसमयी किंवा काही संशयास्पद आढळल्यास 112 नंबरवर कॉल करावा असे आवाहन कणकवली पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले आहे. 112 नंबर हा पोलिस खात्याचा अतिशीघ्र प्रतिसाद देण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काही अनुचित प्रकार दिसल्यास या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांनी केले आहे. कणकवलीतील चोरीच्यावेळी माहिती मिळण्यास काहीसा विलंब झाला. जर 112 नंबरवर तात्काळ पोलिसांना कॉल झाला असता तर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असते. त्यामुळे नागरिकांची सतर्कता तितकीच महत्वाची असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. जाधव यांनी सांगितले.