

प्रमोद म्हाडगूत
कुडाळ : कोकणातील सण, उत्सव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांसाठी ओळखले जातात. येथे एकाच प्रकारचा सण, उत्सव विविध पद्धती, चालीरीतीने साजरा होतो. या गणेशोत्सवातही विविध परंपरा पाहायला मिळतात. अशीच एक परंपरा मालवण तालुक्यातील काळसे -वरचावाडा येथील केळुसकर कुटुंबीय गेल्या 200 वर्षांपासून जोपासत आहेत. या केळुसकर कुटुंबीयांच्या घरात एकाच माटवीखाली तब्बल तीन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्यांचे पूजन केले जाते.
खरे तर केळुसकर कुटुंबीयांच्या घरी पूर्वी या एकाच माटवीखाली पाच गणपतींचे पूजन केले जात होते; मात्र दोनशे वर्षांपूर्वीपासून काही कारणास्तव या माटवीखाली तीन गणपतींचे पूजन सुरू झाले ते आतापर्यंत त्याच उत्साहात सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आमच्या गणपतीसमोर प्रथम भजन केले जाते, त्यानंतर वाडीतील इतर गणपतींची भजने केली जातात. कुटुंबातील अनेक सदस्य नोकरी, व्यवसायानिमित्ताने मुंबईला राहतात; पण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बहुतेक सर्वजण दरवर्षी गावी येतात. प्रत्येक कुटुंब वेगवेगळे जेवण बनवतात आणि नैवेद्य मात्र एकत्रच दाखवला जातो. दरवर्षी सात दिवस गणपतीचे पूजन केले जाते आणि गौरी-गणपती विसर्जन सातव्या दिवशी केले जाते.
सुमारे 200 वर्षांपूर्वी आमच्या घरी पाच गणेशमूर्तीचे पूजन केले जायचे आणि नागपंचमीला नागोबाही 5 पूजले जायचे; पण काही कारणास्तव कौटुंबिक वाद होऊन दोन भाऊ विभक्त झाले, तिथपासून केळुसकरांच्या घरात एकाच माटवीखाली आतापर्यंत तीन गणपतींचे पूजन सर्व कुटुंबीय मनोभावे करत आहेत.