

हरकुळखूर्द ः कोकणातील दशावतारी लोककलेतील प्रख्यात कलावंत, प्रसिद्ध स्त्रीपात्र कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय 49, रा. हरकुळखुर्द सुतारवाडी) यांचे शुक्रवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास घरी विजेचा तीव्र धक्का बसल्याने निधन झाले. ते गाडी वॉशिंग करण्याची इलेक्ट्रिक मशिन, वायर लावून चेक करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जागीच गतप्राण झाले. त्यांच्या अकाली निधनाने हरकुळखुर्द गावासह जिल्हयातील दशावतारी कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी 10.30 वा. च्या दरम्याने ते आपल्या लहान मुलाला अंगणवाडीमध्ये सोडण्यासाठी शाळा नं.1 मध्ये आले होते. त्यानतंर त्यांनी हरकुळखुर्द कोठा येथील वडापाव सेंटर मध्ये बसुन गप्पा मारल्या. काही मित्रांना वडापावही खाऊ घातले. त्यानतंर आपली टु व्हिलर गाडी घेवून घरी गेले. घरी गेल्यानतंर गाडी वॉशिंग करण्याच्या इलेक्ट्रिक मशिनची वायर चेक करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसून ते जागीच कोसळले. मात्र घरातील माणसे कामानिमित्त शेतात असल्याने कोणाला तात्काळ ही घटना समजली नाही. मात्र नंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांना शैलेश मेस्त्री व अन्य शेजार्यांनी तात्काळ उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच प्रशांत मेस्त्री यांचे निधन झाले होते. याबाबतची खबर शैलेश चंद्रकांत मेस्त्री यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी अधिक तपास फोंडा दूरक्षेत्राचे हवालदार सुभाष शिवगण करत आहेत.
प्रशांत मेस्त्री हे दशावतार नाट्यकलेतील प्रसिध्द नाव होते. ते एक उत्कृष्ट स्त्री पार्ट साकारणारे कलाकार म्हणून जिल्हयात ओळखले जात होते. त्यांनी सन्मित्र नाट्य मंडळ सुतारवाडी-हरकुळखुर्द मधून आपल्या अभिनयास सुरुवात केली. त्यानतंर जिल्ह्यातील आरोलकर नाट्य मंडळ, पार्सेकर नाट्यमंडळ आदी विविध कंपन्यामार्फत आपली कला कोकणातील तसेच राज्यातील दशावतार रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या द्रौपदी वस्त्रहरण, महारथी कर्ण, सौभद्र, स्वामी समर्थ आदी दशावतार नाट्य प्रयोगातील भुमिका अजरामर झाल्या आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाची घटना दशावतार कला क्षेत्रातील रसिकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. त्यांच्या रुपाने एका उत्कृष्ट स्त्री पात्र कलाकाराला दशावतार क्षेत्र मुकले आहे, अशा शब्दात अनेक कलावंतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रशांत मेस्त्री यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, चुलते, पुतणे चुलत भाऊ असा परिवार आहे. प्रशांत मेस्त्री यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कुडाळ लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सव 2025 च्या दुसर्या दिवशीचा म्हणजेच शुक्रवारचा संयुक्त दशावतार नाटयप्रयोग रद्द करण्यात आला.