

आचरा : दक्षिण कोकणची काशी मानले जाणाऱ्या "महास्थळ' स्वयंभू श्री देव कुणकेश्वर स्थळी आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर यांची देवस्वारी जवळपास 39 वर्षांनंतर प्रथेपरंपरेप्रमाणे सरंजामशाहीत राजेशाही थाटाने पवित्र महाशिवरात्रीचे औचित्य साधून बुधवारी (दि.२६) जाण्यास निघणार आहे.
या शाही सोहळ्यासाठी सर्वच स्थरातून उत्सुकता लागली आहे. या सोहळ्यासाठी आचऱ्याच्या १२ वाड्यातील ग्रामस्थ, निरनिराळ्या समाजसेवी संस्था, नागरिक आपापल्या परीने स्वेच्छेने सहकार्य करत आहेत. आचरा व ज्या गावातून स्वारी मार्गक्रमण करणार आहे त्या गावातील ग्रामस्थ मंडळी श्री देव रामेश्वराच्या स्वारीच्या स्वागताची तयारी करत आहेत. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे न्यासाच्या विश्वस्त मंडळींनी सदर सोहळ्याचे नियोजन केले आहे.
देव स्वारी सोबत जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी भाविकांतर्फे अल्पोपहार, जेवण व्यवस्था केली जाणार आहे. मार्गावर महिलांसाठी प्रसाधन गृहे, तसेच कचरा नियोजनासाठी कचरा कुंड्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य पथकेही तैनात असल्याची माहिती देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांनी दिली आहे.