

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने सोमवारी रात्री दोन अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्या डंपर वर कारवाई केली. सोमवारी रात्री 8.30 वा. ही कारवाई करण्यात आली असून, दंडात्मक कार्यवाहीसाठी हे दोन्ही डंपर ताब्यात घेण्यात आले आहेत, अशी माहिती कुडाळ तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
8 डिसेंबर रोजी सायंकाळी 8.30 च्या दरम्यान उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तहसीलच्या महसूल पथकाने ही कारवाई केली. कुडाळ महसूलचे पथक गस्तीवर असताना कुडाळ-नाबरवाडी हे डंपर वाळू वाहतूक करताना दिसून आले.
महसूल पथकाने या डंपर्सना थांबवून त्यांच्याकडे वाळू वाहतूक परवाना कागदपत्रांची मागणी केली असता ते नसल्याचे चालकांनी सांगितले. त्यामुळे हे दोन्ही डंपर अवैध वाळू वाहतुकीचे असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले.
महसूल पथकाने हे दोन्ही डंपर ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ तहसील प्रशासनाकडून देण्यात आली. या महसूल पथकात मंडळ अधिकारी रविकांत तारी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सगरे, शिवदास राठोड महसूल यांचा समावेश होता.