

देवगड : चारित्र्याच्या संशयावरून नेपाळी कामगाराने पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना नाद-बेब्याचा सडा येथील कलम बागेत 26 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित प्रेमबहादूर विष्ट (38, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. नाद) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रेमबहादूर विष्ट हा नेपाळी कामगार पत्नी सुनीता (36) हिच्यासमवेत यशवंत रमेश सावंत यांच्या नाद-बेब्याचा सडा येथील कलम बागेत मजुरीचे काम करीत असे. बागेतीलच घरात हे विष्ट कुटुंब राहत होते. 26 ऑगस्ट रोजी रात्री प्रेमबहादूर व त्याची पत्नी सुनीता यांच्यात वाद झाला. या वादात रागाने बेभान झालेल्या प्रेमबहादूर याने पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण केली. दुर्दैवाने या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून भानावर आलेल्या प्रेमबहादूरने लगेचच कलम बागेत मॅनेजर म्हणून कामाला असणार्या मोहन नारायण मोरे यांना फोन करून आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याचे सांगितले. यावरून श्री. मोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन खात्री केली असता प्रेम विष्ट याची पत्नी सुनीता ही मृत स्थितीत दिसली. श्री. मोरे यांनी याबाबत प्रेम याला विचारणा केली असता त्याने आपल्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचे सांगितले. तसेच याच कारणावरून झालेल्या वादात आपण तिला लाकडी दांड्याने मारहाण केली व त्यात तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.