

आंबोली : आंबोलीच्या वर्षा पर्यटन हंगामातील पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक रविवारी दिसून आला. पर्यटकांच्या या गर्दीमुळे संपूर्ण आंबोली घाटमार्ग ते आंबोली मुळवंदवाडी अशी सुमारे १२ कि.मी. पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघे १२ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी वाहनांना तब्बल ४ ते ५ तास लागत होते. यावरून वाहतूक कोंडीची गंभीरता लक्षात येत होती. याबरोबरच आंबोलीतील सर्वच पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या अंतर्गत मार्गांवरही वाहतूक कोंडी होत होती. याचा नाहक त्रास सर्वसमान्य प्रवासी, वाहन चालक व स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांना सहन करावा लागला.
रविवारी दिवसभरात सुमारे दीड लाख पर्यटकांनी आंबोलीला भेट दिल्याचा अंदाज येथील पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला. चौथा शनिवार व रविवार असा वीकेंड असल्याने पर्यटक आंबोलीत शनिवारपासूनच दाखल झाले होते. यामुळे आंबोलीतील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल होते.