

कणकवली : अजित सावंत
गेल्या काही वर्षांपासून याच देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातीचे आंबे देवगड हापूस म्हणून माथी मारून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेमार्फत जीआय रजिस्टर आंबा उत्पादक शेतकर्यांना यूआयडी युनिक कोड दिला आहे. या कोडच्या माध्यमातून देवगड हापूसची खात्री ग्राहकांना पटवून अस्सल चव चाखता येत आहे.
देवगड हापूस ओळखण्यासाठी रंग, आकार आणि सुगंधावरूनही त्याची पारख करता येते. देवगड हापूस हा काहीसा गोलाकार, तांबूस-पिवळसर, त्याची साल पातळ असते आणि सुगंधही चटकन येतो. यासाठी ग्राहकांचा चोखंदळपणा आणि जागरूकता तितकीच महत्त्वाची असते. गुढीपाडव्याच्या शुभारंभी देवगड हापूस आता स्थानिक मार्केटमध्ये अवतरला असून, त्याची किंमतही 1,500 रुपये डझन इतकी वधारलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून देवगड हापूसच्या नावाखाली अन्य जातीचे आंबे विकून ग्राहकांची फसवणूक होताना दिसते. ज्या ठिकाणी देवगड हापूसचे उत्पादन होते त्या भागात देवगड हापूसचा डझनी दर 900 ते 1,500 रुपये असताना औरंगाबाद, पुणे, नागपूर अशा भागांमध्ये 600 रुपये दराने देवगड हापूसच्या नावाखाली आंबा विकला जातो. बर्याचवेळा सिंधुदुर्गातील वर्तमानपत्रांच्या रद्दीमध्ये कर्नाटकी आंबे पॅक करून देवगड हापूसच्या नावाखाली विकले जातात. यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते.
पण, युनिक कोड नसेल तर देवगड हापूस बाहेरून ओळखावा तरी कसा? असा प्रश्न ग्राहकांना पडतो. देवगड हापूस आंबा काहीसा गोलाकार, वरून तांबूस-पिवळसर आणि कडक असतो; मात्र त्याची साल पातळ असते. देवगड हापूसमध्ये रसाचे प्रमाण फार कमी असते. तो खाल्ल्यानंतर त्याची चव लगेच समजते आणि सुगंधही पटकन येतो; तर कर्नाटकी आंब्याची साल काहीशी जाडसर, वरून पिवळसर आणि खालून हिरवट, आकार काहीसा उभट असतो. या आंब्याला सुगंध येत नाही आणि चवही तितकीशी नसते. यासाठी ग्राहकांनी चोखंदळपणे तो तपासून घेणे आवश्यक असल्याचे आंबा उत्पादक सांगतात.
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी यंदापासून देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेमार्फत तालुक्यातील जीआय रजिस्टर शेतकर्यांना टॅपलप्रूफ यूआयडी युनिकोड दिले आहेत. अर्थात, प्रत्येक उत्पादकांचे कोड वेगवेगळे असतात. आंबा फळावर चिकटवलेला हा युनिक कोड दोन तुकड्यात असतो. पहिल्यावर व्हॉटस्अॅप नंबर असतो, तर वरचा भाग काळ्या रंगाचा असतो. त्या व्हॉटस्अॅप नंबरवरून हाय पाठवले की, सिस्टीम काळ्या स्टीकरच्या मागे असलेला डिजिटल नंबर मागते. तो नंबर टाकला आणि सिस्टीम व्हेरीफाय झाली की, त्या उत्पादकाचे नाव, जीआय नंबर, गाव अशी सर्व माहिती मिळते. जेणेकरून तो देवगड हापूसच असल्याची खात्री ग्राहकांना मिळते.