
वेंगुर्ले : तालुक्यातील उभादांडा गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांच्या घराला आग लागल्याने ३.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गिरपवाडी येथील कालिंदी तोरस्कर यांचे भरवस्तीत घर आहे. शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली. त्यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा नारायण तोरस्कर हा त्या वेळी समुद्र किनारी मासेमारी नौका आल्याने काम करत होता. त्याला घराला आग लागल्याचे समजताच तो धावत घरी गेला. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आगीने रौद्ररूप घेतल्याने वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलावला आणि आग आटोक्यात आणण्यात आली. अग्निशमन बंबावरी सागर चौधरी, फायरमन नरेश परब, भाऊ कुबल, पंकज पाटणकर, देवेंद्र जाधव, अजय जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत घर, २ लाख रुपये किमतीची मासेमारी जाळी , घराचे छप्पर, टीव्ही,फ्रिज,मिक्सर, लाईट,घरगुती सामान आदी (एकूण १.५० लाख रुपये किमतीचे) जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदिप भोसले, एएसाय श्री.पारकर,पोलीस हवालदार रुपाली वेंगुर्लेकर, प्रथमेश पालकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.याबाबत नारायण तोरसकर यांनी घटनेची खबर वेंगुर्ले पोलीस स्थानकात दिली असून जळीत नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास महिला पोलिस हवालदार रुपाली वेंगुर्लेकर या करीत आहेत.