वैभववाडी पुढारी वृत्तसेवा
भुईबावडा घाट पायथ्याशी रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देतांना पुणे- पणजी ही हिरकणी बस पलटी झाली. या बसमधून जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकांना प्रवाशांना मुका मार लागला आहे. ही घटना मंगळवारी (दि.17) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-पणजी ही हिरकणी बस क्र. ( एमएच १४ - एक्यू ५९३७ ) गगनबावडा बसस्थानकातून दुपारी २.३५ मिनिटांनी चालक राजू देवराम सोघम व वाहक राजू यादव रा. कोल्हापूर घेवून रवाना झाले. भुईबावाडा घाटाच्या पायथ्याजवळ रिंगेवाडी नजीक पुलानजीक बस आली असता समोरून येणाऱ्या ट्रकने बाजू मारली. त्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने बस पुलाचे रेलिंग पाईप तोडून पलटी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस शैलेश कांबळे, जितेंद्र कोलते, श्री राणे, हरिश्चंद्र जयबाय, श्री. बिलपे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, पोलीस पाटील मनोज चव्हाण, विलास देसाई, कमलाकर देसाई, दीपक माने, सदा देसाई, सदा माने, दिगंबर देसाई व स्थानिक पदाधिकारी यांनी ही मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील चार जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल करण्यात आले आहे.