

वेंगुर्ला: तालुक्यात गुरूवारी (दि.२३) दुपारनंतर विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी भाताची पेंडके भिजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी, नुकत्याच सुरू झालेल्या भातकापणीच्या कामात खंड पडला आहे.
जोरदार पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचले, परिणामी भातशेतीसाठी तयार केलेल्या भाताच्या उडव्या आणि खळे पाण्याने भरून गेले. भाताची पेंडके भिजल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर भातशेती पूर्णपणे करपून गेली आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून गरीब शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरून पाणी वाहत होते, त्यामुळे भाजी विक्रेत्या महिला आणि विक्रेत्यांचे नुकसान झाले. तथापि, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आदींनी वाटप केलेल्या छत्र्यांमुळे महिला विक्रेत्यांना दिलासा मिळाला. मुख्य बाजारपेठेतील खड्डे, कॅम्प एरियाकडे जाणारे रस्ते आणि पोस्ट ऑफिस थांबा ते एस.टी. स्टँडकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. माजी नगरसेवक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहर सौंदर्यकरणात कोट्यवधी रुपयांची बक्षिसे घेऊनही सेंटलुक्स हॉस्पिटल समोरील भागाची अवस्था बकाल झाली आहे. बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज समोरील भागात नवीन कठडा बांधणे, झाडी तोडणे आणि गटार खोदाई करणे आवश्यक असताना संबंधित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
जोरदार पावसामुळे वीजपुरवठा व मोबाईल-टेलिफोन सेवा विस्कळीत झाली. ऐन दिवाळीच्या काळात विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली. शासनाने गोरगरिबांना मोफत गॅसप्रमाणे किमान १० लिटर मोफत रॉकेल पुरवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गुरूवारी (दि.23) तालुक्यात मोठा पाऊस पडूनही वेंगुर्ला एस.टी. आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी एस.टी. बसेसचे सुयोग्य नियोजन करत वाहतूक सेवा सुरळीत ठेवली, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय टळली. मात्र, जुन्या वसाहतीच्या गाड्या पूर्ववत कराव्यात आणि प्लॅटफॉर्मवर बसेस उलट्या लावण्याचा फतवा मागे घ्यावा, अशी मागणी माजी पंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नगरपालिकेने बाजारपेठ वेशी भटवाडी - कंणकेवाडी भागात नागरिकांच्या घरासमोर बांधलेले उंचवटे/पायऱ्या दुचाकी आणि रिक्षाचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच मठ परिसरात अनावश्यक ठिकाणी बांधलेले संरक्षक कठडे निधीचा गैरव्यवहार दर्शवत असल्याची चर्चा आहे. पालकमंत्र्यांनी या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
थंडगार पाऊस पडल्याने शेती, आंबा आणि बागायती निश्चितच बहरण्यास मदत होणार असून, समुद्रतील मच्छिमार बांधवांनाही दिलासा मिळाला आहे. गुरूवारी (दि.२३) सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्याने दिवाळीच्या वातावरणात अधिक गोडवा निर्माण झाला होता.