

दापोली : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरात सध्या म्हाकुळ मासळीचा हंगाम ऐन भरात आला आहे. बंदरावर मच्छीमार नौकांची गर्दी, लिलावासाठी सुरू असलेला गोंगाट तसेच मासळीच्या वासाने दरवळलेले वातावरण असे चित्र सध्या हर्णे बंदरावर पाहायला मिळत आहे. मुबलक प्रमाणात मिळणार्या म्हाकुळामुळे मच्छीमारांमध्ये उत्साह आहे.
बंदरात मुबलक प्रमाणात मिळालेल्या म्हाकुळ प्रकारातील मासळीला स्थानिक पातळीवर किलोला 300 ते 350 रुपये किलो असा दर मिळत असून, लिलावाची रंगत वाढत आहे. म्हाकुळ ही हिवाळ्यात मिळणारी चवदार समुद्री मासळी म्हणून प्रसिद्ध आहे. साधारणपणे ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत या मासळीची आवक मोठ्या प्रमाणात होते.
तिचे मांस मऊ, रसाळ आणि पौष्टिक असल्याने घराघरात तसेच हॉटेलांमध्येही ती खवय्यांमध्ये ‘पहिली पसंती’ ठरत आहे.