

कुडाळ : कुडाळ-गणेशनगर परिसरात पत्नीचा छळ करून तिला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पती सिद्धिविनायक विष्णू कुडाळकर (४२, रा. गणेशनगर, कुडाळ) याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (रा.कुडाळ गणेशनगर) हिने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी स. ८.३० वा. उघडकीस आली होती. याबाबत आत्महत्या केलेल्या महिलेचा भाऊ भूषण सुभाष सांगेलकर (३९, रा. सांगेली, ता. सावंतवाडी, सध्या डोंबिवली पूर्व) यांनी कुडाळ पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून तन्वी हिचा पती सिद्धिविनायक कुडाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत भूषण सांगेलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आपली धाकटी बहीण तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (पूर्वाश्रमीची सोनाली सुभाष सांगेलकर) हिचा १५ वर्षांपूर्वी सिद्धिविनायक कुडाळकर याच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर काही वर्षे संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही दिवसांपूर्वी पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून तन्वी हिने पतीला जाब विचारला होता. तेव्हापासून पती सिद्धिविनायक हा पत्नी तन्वी हिच्यावर संशय तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. प्रसंगी तिला तो शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच माहेरच्या आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईकांशी संपर्क ठेवू नये म्हणून तिच्या मोबाईलमधील माहेरच्यांचे क्रमांकही ब्लॉक केले. त्यामुळे तन्वी मानसिक तणावाखाली होती. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आपली बहीण तन्वी हिने आत्महत्या केल्याचा आरोप, तिचा भाऊ भूषण सांगेलकर यांनी फिर्यादीत केला आहे.
याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धिविनायक कुडाळकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०८ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरुदास पाडावे करीत आहेत. दरम्यान, तन्वी कुडाळकर हिच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.