

Sindhudurg Crime
दोडामार्ग : गुरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतुन खैराची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तस्करी करणाऱ्या मुख्य संशयित संदेश नाईक (रा.तळवडे, ता.सावंतवाडी) याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या मोबाईल मधील व्हाट्सएपवर पिस्तूलासारख्या हत्याराचे विविध व्हिडीओ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने सर्व मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
तर संशयिताच्या व्हाट्सएपवर असलेल्या पिस्तूलाच्या व्हिडीओ संदर्भात चौकशी करण्यासाठी आपण पोलिसांना पत्र लिहिणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांनी दिली आहे. या कारवाईने खैराची तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर पिस्तुलासारखा व्हिडीओ मोबाईलमध्ये असल्याने संशयिताचे इतर अजून कोणते गैरव्यवहार आहेत? याचा तपास होणे आवश्यक असल्याचे यावेळी गोरक्षकांचे म्हणणे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी दुपारच्या सुमारास एका टेम्पोमधून कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी गायी नेल्या जात असल्याची माहिती दोडामार्गमधील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती कसई-दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रविण गवस, खोक्रल सरपंच देवेन्द्र शेटकर आदींना दिली. लागलीच गोरक्षकांनी ही गाडी मणेरी येथे अडवून तिची तपासणी केली असता त्यातून बेकायदेशीररित्या खैराच्या झाडांची वाहतूक होत असल्याचे समोर आले.
याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांना दिल्यावर त्या लागलीच घटनास्थळी दाखल झाल्या. संशयित आरोपी संदेश नाईक याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर मुद्देमालही दाखविला. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तो जप्त केला व संशयितांवर गुन्हा दाखल केला.
संशयित संदेश नाईक याची दोडामार्ग - बांदा राज्यमार्गाला रोपवाटिका आहे. मात्र या रोपवाटिकेच्या आड तो खैराच्या झाडांची तस्करी, कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला. त्याच्या व्हाट्सएपवर पिस्तूलांचे वेगवेगळे व्हिडीओ अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून आलेले आहेत. त्यामुळे त्याच्या चॅटिंगची आणि त्या व्हिडीओची सखोल चौकशी व्हावी. तो हत्यारांची तस्करी तर करीत नाही ना? त्याचे इतर अजून कोणते गैरव्यवहार आहेत का? यात प्रशासनाचे अधिकारी सामील आहेत का? याचाही तपास व्हावा, अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली आहे.