

आचरा : ओळखीचा फायदा घेऊन घरात पाहुणी म्हणून आलेल्या विवाहित महिलेने घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले दागिने लंपास केले. सुमारे 2 लाख 42 हजार रुपयांचे दागिने लंपास झाले असून त्यात 1 लाख 50 हजारांचे मंगळसूत्र, 90 हजार रुपयांचे मंगळसूत्र आणि 2 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन नथी, अशा दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत समिधा गणपत चौगुले (33, रा. आचरा पिरावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आचरा पोलिसांनी संशयित ऋतुजा करुणाघन जोशी (19, रा. मालवण) हिला मंगळवारी ताब्यात घेतले.
समिधा गणपत चौगुले यांनी सोमवारी 8 सप्टेंबर रोजी घरात दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार दिली होती. श्रीमती चौगुले या पती व मुलासह राहतात. संशयित ऋतुजा जोशी ही तिच्या आई वडीलांसोबत चौगुले यांच्या घराशेजारी राहत होती. त्यामुळे तिला लहानपणापासुन चौगुले कुटुंब ओळखतात. सहाजिकच तीचे चौगुलेंच्या घरी येणे-जाणे असे. दरम्यान ऋतुजा जोशी ही पतीसमवेत मालवण येथे राहत असे. जोशी हिचे चौगुले कुटुंबाशी घरगुती संबंध असल्याने फोनद्वारे एकमेकांशी सपंर्क होता.
दरम्यान ऋतुजा ही 5 सप्टें. रोजी चौगुले यांच्या आचरा येथे घरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतर 6 रोजी ऋतुजा ही आपल्या पती सोबत पुन्हा मालवणला निघून गेली. 8 सप्टें. रोजी संध्याकाळी श्रीमती चौगुले यांनी कपाट उघडले. त्यावेळी दागिन्यांचा डबा त्यांना दिसला नाही.
ऋतुजा निघून गेल्यानंतर चौगुले यांच्या घरी दुसरी कोणीही व्यक्ती घरामध्ये आलेली नव्हती, त्यामुळे दागिने ऋतुजा जोशी हिने लंपास केल्याचा संशय बळवला. यानंतर समिधा चौगुले यांनी आचरा पोलिसात चोरीची तक्रार दिली. आचरा पोलिसांनी तात्काळ ऋतुजा जोशीला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास टेंबुलकर करत आहेत.