

कणकवली : हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते. गाय म्हणजे समृद्धी! याच भावनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जीवनात समृद्धीचा मार्ग खुला व्हावा, या उद्देशाने करंजे येथे ‘गोवर्धन गोशाळा’ उभारण्यात येत आहे. या गोशाळेचे उद्घाटन 11 मे रोजी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. राणे म्हणाले, गोवर्धन गोशाळेमध्ये देशभरातील विविध प्रकारच्या गायी पाळल्या जाणार आहेत. यासोबतच शेणापासून गॅस, रंग निर्मिती, गोमूत्रापासून औषध व खत कारखाना उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांकडून गोमूत्र व शेण खरेदी केले जाणार आहे. त्याचबरोबर शेळीपालन प्रकल्पही उभारण्यात आला आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून येथील शेतकर्यांनी या व्यवसायाकडे वळावे, हा यामागचा उद्देश आहे. या व्यवसायातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. गोवर्धन गोशाळेबरोबरच दूध संकलन व्यवस्थाही केली जाणार आहे. ‘गाई पाळा, त्यांची निगा राखा व उत्पन्न मिळवा’ हा या गोशाळेचा उद्देश आहे. स्थानिक गायीचे गोमूत्र देखील खरेदी केले जाणार असून 5 रुपये किलो दराने शेणही घेतले जाणार आहे.
शेतकर्याच्या घरात चार पैसे अधिक येवेत, या दृष्टीने हा प्रकल्प काम करेल. गोशाळेसोबत खत निर्मिती प्रकल्पही राबविला जाणार आहे. शेणापासून गॅस आणि रंगसुद्धा तयार करण्यात येणार आहे. गायीच्या प्रत्येक गोष्टीपासून पैसा उभा राहून तो शेतकर्याच्या घरात कसा जाईल, हे पाहिले जाणार आहे. गोशाळेसोबतच शेळीपालन प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. देशातील शेळीपालनातून मांसाची केवळ 60 टक्के गरज भागविली जाते, उर्वरित 40 टक्के मांस परदेशातून मागवावे लागते. शेळीपालनातूनही मोठी आर्थिक समृद्धी निर्माण होऊ शकते, या उद्देशाने या प्रकल्पात आफ्रिकन, उस्मानाबादी अशा शेळ्या ठेवण्यात येणार आहेत.
देशभरातील विविध जातीच्या गायींचे संगोपन.
शेणापासून गॅस व रंग निर्मिती, गोमूत्रापासून औषध व खत कारखाना.
शेतकर्यांकडून गोमूत्र व शेण खरेदी.
आफ्रिकन व उस्मानाबादी शेळ्यांचा शेळीपालन प्रकल्प.
या गोशाळेत देशातील गायींच्या प्रमुख जाती आणल्या आहेत. 18 ते 22 लिटर दूध देण्याची क्षमता असणार्या या गायी आहेत. लातूरची ‘देवणी’ ही गायीची देखणी प्रजात येथे आहे. सध्या 80 गीर गायी आणल्या असून आणखी 20 गायी लवकरच दाखल होतील.
यावेळी खा. राणे म्हणाले, ‘आपला मुंबईत 1982 पासून चिकनचा व्यवसाय आहे आणि तो सध्या आपला भाऊ सांभाळतो. काही जण कोंबडीवाला असा उल्लेख करतात. कोणताही व्यवसाय कमीपणाचा नाही. शेतकर्यांनी अशा व्यवसायात येऊन आर्थिक समृद्धी प्राप्त करावी, याच उद्देशाने आपण हे प्रकल्प जिल्ह्यात सुरू करत आहोत. यातून जिल्ह्यातील शेतकर्यांना, तरुणांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. आर्थिक समृद्धी आली तरच मुलांना चांगले शिक्षण व सकस आहार देऊ शकतो.
मुलांना सशक्त बनविल्यास ते उत्साहाने शिक्षण घेतील व उद्याचे कर्तबगार नागरिक बनतील.’ तसेच राजकीय टीकाटिप्पणी करण्यापेक्षा विरोधकांनीही असे प्रकल्प उभारावेत, असा सल्ला त्यांनी दिला. एका दिवसात जिल्हा समृद्ध होणार नाही, त्यासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.