

सावंतवाडी ः माडखोल - धवडकी येथून मध्यरात्री घराबाहेरून चोरलेली तीन आसनी रिक्षा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत इचलकरंजी येथून हस्तगत केली. याप्रकरणी मोहम्मद रफीक सलीम मुल्ला (वय 39) आणि संजय भूपाल पोवार (25, दोन्ही रा. इचलकरंजी, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
माडखोल - धवडकी येथील गणपत मोहनशेट कोरगावकर (46) यांची (चक-07 ड-5480) या क्रमांकाची रिक्षा त्यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी (15 जुलै) रात्री घराबाहेर पार्किंग केली होती. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना रिक्षा जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत रिक्षा चोरीची तक्रार दाखल केली.याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञातांनी 16 जुलै रोजी पहाटे 1 ते 6 वा. च्या सुमारास ही रिक्षा चोरल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अति. अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंबोली पोलिस दूरक्षेत्राचे अंमलदार दीपक शिंदे, मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, राजेश नाईक, संतोष गलोले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक स्टेटमेंट यांसारख्या तांत्रिक बाबींचा कसून तपास करण्यात आला. तपासादरम्यान,सदर रिक्षा इचलकरंजी येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस अंमलदार दीपक शिंदे व मनीष शिंदे यांनी घटनास्थळी जात संशयितांसह रिक्षा हस्तगत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार संतोष गलोले करत आहेत.