

नांदगाव : कणकवलीतून मुंबईकडे निघालेल्या कासार्डेतील पती-पत्नीच्या बॅगेतून सुमारे ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले. प्रवासादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पीडित कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, यासंदर्भात महेश चव्हाण यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, या तक्रारीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासार येथील महेश शिवाजी चव्हाण (वय ५४) हे कार्यक्रमासाठी पत्नीसह २५ ऑक्टोबर रोजी मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ते कणकवली स्टेशनवर ट्रेनमध्ये चढले. रात्री प्रवासात त्यांनी आपली ट्रॉलीबॅग सीटखाली ठेवली होती. रत्नागिरी आणि रोहा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने बॅगचे कुलूप तोडले आणि आतील सोन्याचे दागिने चोरल्याचा संशय आहे. चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधून ६ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. यात ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. ट्रेन पनवेल स्टेशनजवळ आल्यावर हा प्रकार लक्षात आल्याने चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
ठाणे रेल्वेस्थानकात उतरल्यावर महेश चव्हाण यांनी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक चिमणाजी वैजनाथ केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.