Sindhudurg News : ४३ लाखांच्या गोवा दारूसह कँटर जप्त

सावंतवाडी पोलिसांची सातार्डा चेकपोस्टवर कारवाई; दोघांवर गुन्हा
Illegal Alcohol Seizure
४३ लाखांच्या गोवा दारूसह कँटर जप्तFile Photo
Published on: 
Updated on: 

सावंतवाडी : सातार्डा पोलिस चेक पोस्ट येथे वाहनांची तपासणी करत असताना मंगळवारी सांय. ४ वा. पोलिसांनी आंध्र प्रदेश येथील आयशर कँटरवर कारवाई करत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा बेकायदा गोवा दारू जप्त केली. कँटरमधून पुठ्ठेच्या आड गोवा दारू भरून ती आंध्र प्रदेश राज्यात वाहतूक केली जात होती. या कारवाईत दारूचे एकूण ५९७ बॉक्स जप्त केले असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर कँटरही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच, कँटर चालक व त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सातार्डा पोलिस दूरक्षेत्र व चेक पोस्ट येथे मंगळवारी पोलिस वाहनांची तपासणी करत असताना एक आयशर कँटर चेक पोस्टवर आला. या कँटरचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी कँटरची तपासणी केली असता समोर पूर्णपणे पुठ्ठे भरण्यात आले होते. पोलिसांनी पुठ्ठे बाजूला करून पाहिले असता गोवा दारूचे बॉक्स दिसून आले. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सातार्डा चेक पोस्ट येथे जात कँटर ताब्यात घेतला.

सावंतवाडी येथे आणून त्यातील मुद्देमाल बाहेर काढला असता गोवा दारूचे ५९७ बॉक्स सापडून आले. या दारूची किंमत ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये एवढी आहे. यात वाहतुकीसाठी वापरलेला २० लाख रुपयांचा आयशर कँटर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी प्रदीप भास्कर रामाराव, व्यंकट नागराज बालम (दोघेही रा. वेल्लुर- आंध्र प्रदेश) यांच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.