दोडामार्ग : तळकट येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणार्या दोघांच्या दोडामार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 2 लाखांच्या दारूसह 4 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंजुनाथ मालगोंडा गेडगिरी (24) व राजू सुनील चौधरी (दोघेही रा. फुलबाग गल्ली, बेळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. बुधवारी पहाटे 4.20 वा. च्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली.
कुंभवडेमार्गे दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक ओतारी, उपनिरीक्षक आशिष भगत, सहायक उपनिरीक्षक गवस, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र मळगावकर, कॉन्स्टेबल विजय जाधव व चालक फिलिप सोज हे तळकट ते कुंभवडे मार्गावर सापळा रचून होते. बुधवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास या मार्गावरील जंगलमय भागात एक कार आली असता पोलिसांनी तपासणीसाठी ती थांबविली.
यावेळी कारची झडती घेतली असता गाडीत एकूण 2 लाख 28 हजार रुपयांचे गोवा बनावटीचे बिगर परवाना मद्य आढळले. पोलिसांनी दारू व 2 लाख 50 हजार रुपये किमतींची टाटा इंडिको कार असा एकूण 4 लाख 78 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिगर परवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.