

अजय गडेकर
Girgaoncha Raja Ganpati Turban Enters World Record Book of India – 6 Feet Tall & 200 Kg
वेंगुर्ले : गणेशोत्सव हा गणेश चतुर्थीला सुरू होणारा एक महत्त्वाचा सण आहे. जो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. ज्यामुळे हा सण सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा बनला आहे.
ह्या सार्वजनिक मंडळांपैकी एक म्हणजे गिरगाव मधील निकदवारी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यालाच 'गिरगावचा राजा' या नावाने सुद्धा संबोधले जाते. गिरगावचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावेळी म्हणजेच गणेशोत्सव २०२५ मध्ये एक अनोखा इतिहास रचला आहे. यावेळी या गणेशोत्सव मंडळाने पारंपारिक महाराष्ट्रीयन फेट्याचा भव्य नमुना साकारत जगातील सर्वात उंच व जड फेटा उभारला आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाच्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम केले आहे. म्हणूनच त्यांनी गिरगावच्या राजाच्या जगातील मोठ्या महाराष्ट्रीयन फेट्याची नोंद करून तसेच, अधिकृत घोषणा करून मंडळाचे अभिनंदन केले.
या फेट्याचे एकूण वजन तब्बल २०० किलो (रचनेसह) आहे. २७ ऑगस्ट २०२५ रोजी गिरगाव, मुंबई येथे या अद्वितीय निर्मितीचे अनावरण झाले आणि त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये झाली आहे.
ही अनोखी कलाकृती केवळ आकारानेच नव्हे तर भक्तीभाव, परंपरा आणि कौशल्य यांचे प्रतीक ठरली आहे. गणेशोत्सव आणि महाराष्ट्रीय संस्कृती यांचा भव्य संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला, अशी प्रतिक्रिया वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांनी दिली.