

बांदा : सावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटात रविवारी सकाळी दुचाकीस्वाराला गव्याने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात मनोज धोंडू सावंत (29, रा. इन्सुली डोबाशेळ) हा युवक गंभीर जखमी झाला, दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
मनोज सावंत या घाटरस्त्यावरून जात असताना अचानक दहा ते बारा गव्यांचा कळप धावत रस्त्यावर आला. यातील एका गव्याने मनोज यांच्या चालत्या दुचाकीला धडक दिली. सुदैवाने मनोज याला गंभीर दुखापत झाली नाही; परंतु दुचाकीचा मात्र चक्काचूर झाला. धडक दिल्यानंतर गव्यांचा कळप लगतच्या जंगलात पसार झाल्याने अनर्थ टळला या अपघातानंतर महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोज सावंत हा सावंतवाडी येथून दुचाकीने घरी परतत असताना ही घटना घडली. इन्सुली घाटात वळण घेत असताना गव्याने अचानक त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर उत्कर्ष युवक मंडळाचे स्वागत नाटेकर, नितीन राऊळ, अनिरुद्ध पालव, रामचंद्र पालव, पिंट्या नाईक, आशीर्वाद पालव, संकेत राऊळ आणि महेंद्र पांडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली.
या परिसरात गव्यांच्या कळपाचे वाढते प्रमाण पाहता, वाहनचालक आणि स्थानिकांकडून महामार्गावर येणार्या गव्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणावे अशी मागणी वनखात्याकडे केली जात आहे.