

देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. मिलिंद महादेव कुबल (वय 56, रा. आनंदवाडी-देवगड), मनोज वसंत जाधव (50, रा. देवगड किल्ला, देवगड), सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (25, रा. तारकर्ली काळेथर, मालवण), गौरव विनोद पाटकर (22, रा. वायरी आडवण) अशी या संशयितांची नावे आहेत.
या कारवाईत 3 हजारांच्या गांजासह दोन दुचाकी असा सुमारे 2 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चारही संशयितांविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथकाने सापळा रचला होता. त्यानुसार कुणकेश्वर ब्राह्मणदेव मंदिर परिसरात दोन दुचाकींवर मिलिंद महादेव कुबल, मनोज वसंत जाधव, सिद्धेश अनिरुद्ध मयेकर, गौरव विनोद पाटकर हे संशयित थांबलेले दिसले. पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते; मात्र पथकाने त्यांना शिताफीने पकडले.
संशयितांकडे सुमारे 3 हजार रुपये किमतीचा 95 ग्रॅम गांजा तसेच दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. प्राथमिक चौकशीत हा गांजा मालवणमधील सिद्धेश मयेकर व गौरव पाटकर यांना देण्यासाठी आणल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली केली. यात उपनिरीक्षक सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष जमादार आदींचा समावेश आहे.