

दोडामार्ग : तालुक्यातील विरोधकांनी आमच्यावर टीका जरूर करावी; मात्र त्यांनी हे लक्षात घ्यावे, की तेही एका काळात सत्तेवर होते. हत्तींचा प्रश्न हा आजचा नसून सन 2002 पासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वावर सुरू आहे. आजपर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने या समस्येवर विविध उपाययोजना केल्या. मात्र अपेक्षित यश कोणालाही मिळालेले नाही. त्यामुळे केवळ आम्हालाच दोषी ठरवून लक्ष्य करू नये, अशी भूमिका शिवसेना (शिंदे गट) दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी मांडली आहे.
हत्ती प्रश्नावरून शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत हत्ती हटाव साठी आम्ही आमच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावर विरोधी असलेल्या ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. त्याला उत्तर देताना श्री. गवस म्हणाले, हत्तीमुक्त दोडामार्ग तालुका व्हावा यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न सुरू असून, या जबाबदारीतून आम्ही कधीही पळ काढणार नाही. ते पुढे म्हणाले की, अलीकडेच ‘ओंकार’ हत्ती पकड मोहिमेबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असून, हत्तीला पकडण्यास नकार देत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र काही हत्तीप्रेमी दोडामार्ग तालुकाच हत्तींचा नैसर्गिक अधिवास असल्याचा दावा करत आहेत. याला आमचा ठाम विरोध आहे.
आज आपण शांत राहिलो, तर उद्या ‘हत्ती दोडामार्गचेच आहेत’ असा मुद्दा पुढे करून केवळ नुकसानभरपाई देण्याचे आमिष दाखवले जाईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी तालुक्याच्या माथी मारला जाईल, हा धोका ओळखून पक्षीय मतभेद विसरून दोडामार्ग तालुक्यातील सर्व नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.