Sindhudurg Ganeshotsav | गणेशोत्सव... परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!

Sindhudurg Ganeshotsav | सिंधुदुर्ग म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगररंग, लाल मातीची वाट, कौलारू घरे, अंगणातली तुळस आणि माणसांच्या मनात जपलेली आपुलकी.
Sindhudurg Ganeshotsav | गणेशोत्सव... परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!
Published on
Updated on

सिंधुदुर्ग म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगररंग, लाल मातीची वाट, कौलारू घरे, अंगणातली तुळस आणि माणसांच्या मनात जपलेली आपुलकी. या भूमीच्या सांस्कृतिक जीवनात अनेक सण-उत्सवांना विशेष स्थान आहे; मात्र गणेशोत्सवाची गोष्ट काही वेगळीच आहे. कारण इथे गणपती म्हणजे केवळ देवघरात विराजमान होणारी मूर्ती नाही, तर घराला पुन्हा घरपण देणारा, माणसांना पुन्हा एकत्र आणणारा आणि गावाला पुन्हा जिवंत करणारा उत्सव आहे.

Sindhudurg Ganeshotsav | गणेशोत्सव... परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!
Sindhudurg News : बाप्‍पांच्‍या स्‍वागतासाठी सिंधुदुर्ग सज्‍ज; लाखोंच्‍या संख्येने मुंबईकर दाखल

श्रावण सुरू झाला की कोकणात गणेशोत्सवाची चाहूल लागते. घरांची साफसफाई सुरू होते, मखराची तयारी होते, अंगण सजते, बाजारपेठा गजबजतात आणि दूरवर नोकरी-व्यवसायासाठी गेलेल्या माणसांच्या परतीची वाट पाहिली जाते. मुंबई, पुणे, ठाणे तसेच राज्याच्या इतर भागांत राहणारा कोकणवासी गणपतीसाठी आपल्या गावी परततो. वर्षभर दूर असलेली भावंडे, नातेवाईक, मित्रमंडळी पुन्हा एकत्र येतात. सिंधुदुर्गाच्या गणेशोत्सवाचे हेच कदाचित सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

'बाप्पा येतो आणि माणसांना जवळ आणतो.'
सिंधुदुर्गातील गणेशोत्सव हा म्हणूनच श्रद्धेबरोबरच कुटुंब, गाव आणि परंपरेचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सांस्कृतिक परंपरांमध्ये गणेशचतुर्थीला महत्त्वाचे स्थान असून भजन, फुगड्या आणि विविध लोककला या उत्सवाशी जोडलेल्या आहेत. गावागावांत गणेशोत्सव काळात वातावरण भक्तिमय करणारे भजनांच्या तालमी आधीपासून सुरू होतात. अभंग, गवळणी, गजर आणि पारंपरिक वाद्यांचा नाद उत्सवाला वेगळीच रंगत देतो.

या परंपरेत आपल्या मातीचा सुगंध आहे. घरगुती गणपती, गौरीचे आगमन, आरती, नैवेद्य, मोदक, भजन, फुगड्या, नातेवाईकांच्या भेटीगाठी, लहान मुलांचा उत्साह, आजी-आजोबांच्या आठवणी आणि गावच्या मंडळांचे सामूहिक नियोजन, या सगळ्यांनी मिळून सिंधुदुर्गाचा गणेशोत्सव आकार घेतो. कुठे घरांतील ज्येष्ठ व्यक्ती परंपरा सांगते, कुठे आई किंवा आजी मुलांना नैवेद्याची पद्धत शिकवते, तर कुठे तरुण मंडळी सजावट, आयोजन आणि डिजिटल माध्यमांची जबाबदारी सांभाळतात.

अशा प्रकारे प्रत्येक पिढी आपापल्या पद्धतीने उत्सवात सहभागी होते. राज्य शासनाच्या वतीने आता गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचे स्वरूप देण्यात आले असून त्यानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, गणेशोत्सवाशी संबंधित रील्स व डिजिटल उपक्रम, प्रमुख गणेशस्थळांचे ऑनलाईन दर्शन आणि विविध क्षेत्रांतील स्थानिक सहभागाला प्रोत्साहन देण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

या सगळ्या उपक्रमांचा अर्थ उत्सव मोठा, भव्य किंवा खर्चिक करणे एवढाच नाही. उलट, आपली परंपरा जपत उत्सव अधिक अर्थपूर्ण कसा करता येईल, हा त्यामागचा खरा विचार आहे.
गणेशोत्सव मंडळांनी यंदा आपल्या परिसरातील पारंपरिक कला आणि स्थानिक संस्कृतीला सजावटीचा आणि कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनवावे.

सिंधुदुर्गाची दशावतार लोककला, स्थानिक हस्तकला, पारंपरिक वाद्ये, कोकणी-मालवणी संस्कृती, गावचा इतिहास, स्थानिक देवस्थाने, किल्ले, लोकपरंपरा अशा विषयांवर देखावे, प्रदर्शन, कथाकथन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता येतील. सिंधुदुर्गाच्या सांस्कृतिक ओळखीत दशावताराबरोबर चित्रकथी, गंजिफा, कोळीनृत्य आणि विविध परंपरांचाही महत्त्व आहे.

मुलांसाठी गणपती म्हणजे आनंदाचा सण. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा उत्सव घडविणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा, गणेशोत्सवावरील चित्रकला, निबंध, वक्तृत्व, कथाकथन, पारंपरिक खेळ, प्रश्नमंजुषा किंवा स्थानिक इतिहासावर आधारित उपक्रम घेता येतील. तरुणांसाठी डिजिटल डिझाइन, रील्स, छायाचित्रण आणि माहितीपट निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देता येतील. ज्येष्ठ नागरिकांकडून गावच्या गणेशोत्सवाच्या जुन्या आठवणी ऐकून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविता येतील.

गणेशोत्सव म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे; तो पिढ्यांना जोडणारा सांस्कृतिक दुवा आहे.
यंदा या दुव्याला पर्यावरणाची जोड देऊया. बाप्पाच्या स्वागतासाठी शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती निवडणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, नैसर्गिक साहित्याने सजावट करणे, निर्माल्य वेगळे संकलित करणे आणि शक्य तिथे पर्यावरणपूरक विसर्जनाची व्यवस्था करणे, हे प्रत्येक घर आणि मंडळाला सहज शक्य आहे.

Sindhudurg Ganeshotsav | गणेशोत्सव... परंपरेचा, आपुलकीचा आणि नव्या जाणिवांचा उत्सव!
Ambergris Smuggling Case: पणदूर तिठ्यावर ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; सिंधुदुर्ग LCBची मोठी कारवाई

फुले, पाने, नारळाच्या झावळ्या, बांबू, कापड, कागद, माती आणि स्थानिक उपलब्ध साहित्य वापरून केलेली सजावट ही दिसायलाही सुंदर असते आणि आपल्या मातीतील परंपरेशीही जोडलेली असते. गणेशोत्सवाच्या काळात विविध श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक भावना आपल्या आसपास नांदत असतात. त्यामुळे आपल्या आनंदासोबत इतरांच्या श्रद्धांचा आणि भावनांचा आदर राखणे हीदेखील उत्सवाचीच संस्कृती आहे.

संयम, परस्पर सन्मान, आपुलकी आणि सलोखा यामुळे उत्सवाचा आनंद अधिक खुलतो. कोणाचीही भावना दुखावणार नाहीत, याची जाणीव ठेवून आनंद साजरा केला तर आपल्या उत्सवाची उंची आणखी वाढेल.
बाप्पा आपल्याला बुद्धी, विवेक आणि सद्भावनेचा आशीर्वाद देतो, असे आपण मानतो. मग यंदाचा उत्सवही त्याच मूल्यांना साजेसा का नसावा?

  • आनंद असू दे, पण त्याला संवेदनशीलतेची साथ असू दे.

  • उत्साह असू दे, पण त्याला शिस्तीची जोड असू दे.

  • परंपरा असू दे, पण त्यासोबत नव्या पिढीची सर्जनशीलता असू दे.

  • सजावट असू दे, पण निसर्गाची किंमत मोजून नव्हे.

  • रोषणाई असू दे, पण ऊर्जेची उधळपट्टी नको.

  • उत्सव असू दे, पण त्यात प्रत्येकाचा सहभाग असू दे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news