

देवगड : गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर सरकारने देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति कलम २२० रुपये याप्रमाणे मदत जाहीर केली. त्यानुसार सुमारे ६ हजार शेतकऱ्यांची यादीही तयार करण्यात आली. मात्र, गणेश चतुर्थी सण तोंडावर आला तरी ही मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी देवगड तालुका आंबा-काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी केली.
काका ढोके यांनी सांगितले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळाल्यासत्यांना सणाच्या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. शासनाने मदत जाहीर करून त्याची यादीही तयार केली आहे, त्यामुळे आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. यावेळी त्यांनी पीक विम्याच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरले. देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून विम्याचे हप्ते भरले असून विमा कंपनीकडे केंद्र व राज्य सरकारच्या सहभागासह शेतकऱ्यांचे मिळून सुमारे २२ कोटी रुपये जमा झाले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र तालुक्यातील अनेक सर्कलमधील शेतकऱ्यांना अपेक्षित विमा भरपाई मिळालेली नाही.
बापर्डे, मिठबाव, शिरगाव आदी सर्कलमध्ये काही प्रमाणात मदत मिळाली असली, तरी देवगड व परिसरातील काही सर्कलमधील शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित असल्याचे ढोके यांनी सांगितले. आतापर्यंत अंदाजे २ कोटी ६५ ते ७० लाख रुपयांपर्यंतची रक्कम वितरित झाली असून उर्वरित सुमारे १८ ते १९ कोटी रुपयांचे काय झाले, याचा जाब कोण घेणार?, असा सवाल त्यांनी केला.
जि. प., पं. स. सदस्यांना पेन्शन मिळावी या मागणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पेन्शनसाठी एकत्र येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठोस भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. पालकमंत्री नीतेश राणे यांनीही शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत सर्व सर्कलमधील पात्र शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बागायतदार गणेश वाळके, अजय तेली यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.
पं. स. सभापतींवर टीका
पं. स. सभापती गणेश राणे यांच्यावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे आंदोलन झाले की ते विरोधकांचे आंदोलन असल्याचे सांगितले जाते. मात्र आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळत नसताना त्यासाठी किती वेळा आवाज उठवला ? किती प्रयत्न केले? आणि पं.स. याबाबत ठराव घेतला का? असा सवाल ढोके यांनी केला.