

मळगाव : गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांनी सात दिवसांच्या गौरी-गणपतीचे विसर्जन करत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले होते. आता सात दिवसांनी गौरी-गणपती विसर्जन होताच हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. रेल्वे, एसटी, खासगी आराम गाड्या तसेच वैयक्तिक गाड्यांनी हे गणेशभक्त परतीचा प्रवास करत आहेत. यामुळे रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक अशा सर्वच ठिकाणी मुंबईकर गणेशभक्तींची गर्दी उसळल्याचे चित्र आहे.
सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून मुंबईकर गणपती स्पेशल रेल्वे गाडीने मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. कोकणात अनंत चतुर्थीपर्यंत साजरा होणार्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने गणपती स्पेशल रेल्वे गाड्या सुरू करून गणेश भक्तांची सोय करून दिली आहे.
कोकण रेल्वेने गणेशोत्सव कालावधीत केलेल्या योग्य नियोजनामुळे मुंबईकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. या बरोबरच जिल्ह्यातील सर्वच एसटी स्थानकांमधून मुंबई, ठाणे, कल्याण, बोरीवली, वसई, विरार, परळ, कुर्ला नेहरूनगर आदी ठिकाणी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.