

देवगड : खाक्शी तिठा येथील चंद्रकांत गोपाळ घाडीगांवकर यांच्या राहत्या घरी धन्यवाद रिलेशन क्लब या नावाखाली जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 40 हजार 80 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 12 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री 11.52 वा. उघडकीस आली. हेड कॉन्स्टेबल आशिष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम 5 हजार 380 रु.,9 मोबाईल फोन: एकूण किंमत 32 हजार रु., इतर साहित्य (टेबल, खुर्ची): किंमत 2700 रु. असा एकूण 40 हजार 80 रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये संशयित म्हणून चंद्रकांत गोपाळ घाडीगांवकर (वय 62, रा. खाक्शी तिठा), संदीप सखाराम सुर्वे (43, रा. किंजवडे-सुर्वेवाडी),दर्शन प्रदीप भोवर (32, रा. जामसंडे-विष्णूनगर), शिवाजी भिवा कोळेकर (50, रा. जामसंडे), उत्तम प्रदीप कोयंडे (50, रा. जामसंडे -कट्टा), दशरथ दयानंद जावकर (69, रा. विजयदुर्ग-रामेश्वर), एकनाथ आत्माराम गुरव (47, रा. जामसंडे-वडांबा), राजेंद्र वसंत जाधव (35, रा. वाडा),साई गणेश कांबळी (30, रा. वाडातर), वैभव अशोक खरात (30, रा. जामसंडे- कट्टा),उमेश अरुण जाधव (40, रा. वाडा- मूळबांध), नितीन घनःशाम तारकर (57, सर्व रा. देवगड तालुका) अशा सर्व 12 संशयितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (अ), 4 आणि 5 अंतर्गत सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितसर कारवाई करून या सर्वांना सोडण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि हेड कॉन्स्टेबल आशिष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.