

कणकवली ःसिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी आ. राजन तेली यांनी गुरुवारी मुंबईतील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे. राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेला आणखी बळ मिळणार आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राजन तेली यांनी भाजपमधून ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले होते. त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिंदे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात राजन तेली हे निवडणूक रिंगणात होते. त्या निवडणूकीत आ. दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून राजन तेली हे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ते पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार की शिंदे शिवसेनेत जाणार? अशाही चर्चा होत्या. मात्र राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी मुंबईतील गोरेगाव येथे झालेल्या शिंदे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री रामदास कदम, माजी खा. गजानन किर्तीकर, आ. दीपक केसरकर आदी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजन तेली यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे शिवसेनेला सिंधुदुर्गात धक्का बसला आहे. राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशामुळे सिंधुदुर्गात शिंदे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.