

कुडाळ :
‘फ्लाय 91’ या प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणार्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती मागणी आणि उद्योगातील सुरू असलेल्या कार्यात्मक अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार्या या उपक्रमांतर्गत, प्रवासी कोणत्याही उपलब्ध भविष्यकालीन प्रवास तारखेसाठी तिकिटे आरक्षित करू शकतात. यामुळे त्यांना थेट आर्थिक बचत तर मिळेलच, शिवाय सणासुदीच्या प्रवासाचे नियोजन अधिक सहज, सोपे आणि निर्विघ्न होईल. कन्क्व्हिनियन्स फी रद्द करण्यामागील विमानसेवेचा उद्देश म्हणजे ग्राहक-प्रथम दृष्टीकोन अधोरेखित करणे, तसेच तिकीट दरांमध्ये अधिक पारदर्शकता आणणे असा आहे.
उत्तरी गोव्यातील मोपा येथून कार्यरत असलेली प्युअर प्ले रिजनल एअरलाईन फ्लाय 91 ही भारतातील टियर-2 आणि टियर-3 शहरांना विश्वासार्ह शॉर्ट-हॉल उड्डाणांद्वारे जोडते. गोव्यात मुख्यालय असलेली ही कंपनी जळगाव, सिंधुदुर्ग, अगत्ती (लक्षद्वीप), पुणे, सोलापूर, हैदराबाद आणि बंगळूर यांसारख्या गंतव्यस्थानांदरम्यान सुलभ प्रवासाची सुविधा देते.
प्रवाशांच्या अनुभवाला खर्या अर्थाने मूल्य देणे हेच आमचे कायमचे प्राधान्य राहिले आहे. सध्या हवाई उद्योगासमोर उभ्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही, सणासुदीच्या काळात प्रवाशांना तणावरहित आणि सहज नियोजनाची सुविधा मिळावी यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे ‘फ्लाय-91’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले.