Sindhudurg News : दोडामार्ग तालुक्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत
Sindhudurg News
दोडामार्ग तालुक्यात पूरस्थिती
Published on
Updated on

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याला मंगळवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. यामुळे नदी, नाले आणि ओहोळ दुथडी भरून वाहू लागल्याने तालुक्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेले. परिणामी, अनेक गावांचा संपर्क तुटला, तर रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने झाडांची पडझड झाली असून अनेक गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तालुक्यात रविवारपासून सुरू संततधार पाऊस सोमवारी दुपारनंतर मुसळधार कोसळू लागला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले आणि ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले. गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट रस्त्यांवर आले आणि अनेक ठिकाणी जलमय स्थिती निर्माण झाली. दोडामार्ग शहरातील मुख्य राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ नदीसारखे दृश्य निर्माण झाले व वाहतूक मंदावली. तालुक्यातील घोटगेवाडी, परमे, कुडासे आदी कॉजवे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

तिलारी नदी इशारा पातळीवर

तिलारी नदीची इशारा पातळी ४१.६० मी. असून सध्याची पाणी पातळी ४०.६० मी. इतकी झाली आहे. हे पाणी इशारा पातळीच्या जवळ पोहोचल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी पसरू लागले आहे. फळबागा आणि शेती पाण्याखाली गेली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिलारी परिसर पुन्हा एकदा जलमय होण्याची भीती आहे. प्रशासनाने नदीकाठ ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news