

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सिध्देश नामक एका युवकाचे अपहरण करून त्याच्यावर जीवघेणी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्या युवकाला बांदा परिसरातील नदीकिनारी फेकून दिले. सुदैवाने युवक शुद्धीवर येताच ग्रामस्थांची मदत घेऊन वाचला असून, सध्या त्याच्यावर कुडाळ येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील सिद्धेश या युवकाच्या मध्यस्थीने वेंगुर्ले तालुक्यातील एका व्यक्तीला कुडाळ शहरात फ्लॅट भाडेतत्त्वावर मिळवून देण्यात आला होता. मात्र, भाडे न भरल्याने सिद्धेश याने त्या व्यक्तीला विचारणा केली. याच रागातून त्या व्यक्तीने आपल्या साथीदारांच्या मदतीने सिद्धेश याला वेंगुर्ले तालुक्यातील एका गावात बोलावून घेत बेदम मारहाण करून बांदा परिसरातील नदीकिनारी फेकून दिले.सुदैवाने सिद्धेश काही वेळानंतर शुद्धीवर आला आणि ग्रामस्थांची मदत घेत आपल्या जीवाचे रक्षण केले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याला कुडाळ रूग्णालयात दाखल केले. वेंगुर्ले पोलिसांनी तातडीने रूग्णालयात पोहोचून जखमी युवकाचा जबाब नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात गर्दी केली होती. लवकरच ग्रामस्थ पोलिस निरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे समजते.