

कणकवली : नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडतीमध्ये देवगड, कुडाळ, कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी नगरपंचायत तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहे. कणकवलीचे नागरिकांचा मागास प्रवर्ग तर मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या काहींना लॉटरी तर काहींची संधी हुकली आहे.
सिंधुदुर्गातील नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात काढण्यात आली. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाच्या निश्चितीकरिता नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये नगराध्यक्षपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील चार नगरपंचायती आणि एका नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे खुले झाल्याने याठिकाणी खुल्या प्रवर्गासह सर्वांनाच संधी मिळणार आहे. तर मालवण नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे ओबीसी महिला आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळणार आहे.
तसेच कणकवली नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने खुल्या प्रवर्गातील इच्छुकांची संधी हुकली आहे. आता आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीस प्रारंभ होणार आहे.