

मासेमारी हंगाम लांबण्याची कारणे
1 ऑगस्ट पासूनच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा
पट्टा परिणामी सागरी वातावरण प्रतिकूल
सप्टेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी
दाबाचा पट्टा परिणामी अरबी समुद्र खवळलेला
त्यानंतर ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे अरबी समुद्र अशांत
लागलीच परतीच्या पावसाचा जोर; परिणामी अरबी
समुद्र पुन्हा खवळला
यावर्षी मत्स्य उत्पादन वाढणार!
सगुण मातोंडकर
मळगाव : कोकण किनारपट्टीवर पावसाळी हंगामातील दोन महिने मत्स्यबंदी कालावधी होता. परंतु, प्रतिकूल समुद्री हवामानामुळे 10 ऑक्टोबरपर्यंत मच्छीमाराना मासेमारी बंद ठेवावी लागली. यामुळे जिल्ह्यात मासेमारीचा हंगाम तब्बल साडेचार महिने लांबला. परिणामी माशांचे दर कमालीचे वधारले असून हंगाम लांबल्याने मत्स्यव्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जून, जुलै या पावसाळी हंगामात मत्स्य प्रजनन होते. शिवाय मान्सूच्या आगमनामुळे समुद्र खवळलेला असतो. सहाजिकच मत्स्य प्रजननात अडथळा निर्माण होऊ नये तसेच खवळलेल्या समुद्रामुळे एखादी दुर्घटना घडू नऐ, म्हणून म्हणून संपूर्ण देशभरात ही मच्छीमारी बंदी कायद्याने लागू करण्यात आली आहे. दरवर्षी 1 ऑगस्ट पासून नवीन मासेमारी हंगाम सुरु होतेो. मात्र कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमेपासूनच खऱ्या अर्थाने नवीन मासेमारी हंगाम सुरू होतो.
मात्र या वर्षी 1 ऑगस्टपासूनच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सागरी वातावरण प्रतिकूल बनले. तर सप्टेंबरमध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्र खवळलेला राहिला. त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ या चक्रीवादळामुळे अरबी समुद्र अशांत होता. लागलीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने परतीच्या पावसाचा जोर वाढला, परिणामी अरबी समुद्र पुन्हा खवळला, 10 ऑक्टोबरपर्यंत ही प्रतिकूल परिस्थिती कायम राहिल्याने गेले दोन-अडीच महिने मासेमारीचा नवा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकला नाही. यामुळे या वर्षी तब्बल साडेचार महिने म्हणजेच सुमारे 130 दिवस मासेमारी बंदी सुरू राहिली. सहाजिकच याचा विपरीत परिणाम मासळी उत्पादनावर झाला. या कालावधीत जिल्ह्यात खाडीतील मासळी किंवा बाहेरून आयात केलेली मासळी उपलब्ध होती.मात्र स्थानिक मासळी उपलब्ध नसल्याने या मासळीचे दर कमालीचे वधारले होते. याचा फटका स्थानिक ग्राहकांबरोबरच पर्यटक, हॉटेल व्यावसायिक व मच्छीमारांनाही बसला आहे.
कोकण किनारपट्टीवरील मासळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी असते. मात्र मासेमारी हंगाम लांबल्याने ही मासळी निर्यातही अजून ठप्प आहे. यामुळे मासळी उद्योजकांबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. दरम्यान समुद्रातील धोकादायक परिस्थिती विचारात घेऊन मेरी टाईम बोर्डाने जिल्ह्यातील मच्छीरांना मासेमारीसाठी टोकण देणे बंद केले होते. आता 10 ऑक्टोबर पासून समुद्र शांत झाल्याने जिल्ह्यातील 2500 मच्छीमारांना आता पूर्वत टोकन देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अजूनही मासेमारी हंगाम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. यामुळे अजुनही बाजारात मासळीचे दर वधारलेलेच आहेत.
आता 10 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगाम वातावरण अनुकूल राहिल्यास मे अखेरपर्यंत चालणार आहे. मच्छीमारी हंगाम सुरू होताच मच्छीमारांकडून घाऊक माशांची खरेदी करण्यासाठी मासे वाहतूक करणाऱ्या गाड्या दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या मत्स्य विक्रीला चांगला भाव मिळत असल्याने मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने मत्स्य प्रजनास पोषक कालावधी म्हणून जून व जुलै या साठ दिवसाच्या कालावधीत मत्स्यबंदी केली आहे. जीवसृष्टी अभ्यासकांच्या मतानुसार मत्स्यबंदी कालावधी वाढवण्याची काही स्वयंसेवी संस्थानी केंद्र शासनाकडे केलेली मागणी विचाराधीन आहे. परंतु, सागरी किनारपट्टीवर यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे 130 दिवसापर्यंत मत्स्य बंदी पाळली असल्यामुळे समुद्रातील मत्स्य प्रजनन समाधानकारक झाले आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मत्स्य उत्पादन वाढणार असल्याचे जीवसृष्टी अभ्यासकांचे मत आहे.