Sindhudurg : मत्स्य हंगामाच्या पहिल्या दिवशी सहा. मत्स्य आयुक्त गायब

मालवणात ठाकरे शिवसेना आक्रमक : आयुक्तांच्या कार्यालयाला घातला पुष्पहार
Sindhudurg News
मत्स्य हंगामाच्या पहिल्या दिवशी सहा. मत्स्य आयुक्त गायब
Published on
Updated on

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवार पासून मासेमारी हंगाम सुरू झाला असताना परप्रांतीयांचे अतिक्रमण आणि पर्ससीन मासेमारी रोखण्यासाठी हायस्पीड गस्ती नौकेची मागणी घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मच्छीमारांचे एक शिष्टमंडळ सहायक मत्स्य आयुक्तांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी सहा. आयुक्त कार्यालयात पोहचले होते. मात्र, त्याठिकाणी मत्स्य आयुक्तच उपलब्ध नसल्याने त्यांच्या कक्षाला अभिनव पद्धतीने पुष्पहार अर्पण करून ठाकरे -शिवसेना पदाधिकारी आणि मच्छीमारांनी निषेध नोंदविला.

मच्छीमारांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही मत्स्य व्यवसाय विभागाकडून होत नसल्याबद्दल लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शहरप्रमुख बाबी जोगी यांनी यावेळी दिला.युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपशहरप्रमुख उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, स्वप्नील आचरेकर, अन्वय प्रभू चंद्रकांत प्रभू, हेमंत मोंडकर, उपेंद्र तोडणकर, रवि मीटकर, प्रसाद आडवणकर, देवानंद मोंडकर तसेच इतर उपस्थित होते.

मच्छीमार आणि शिवसेना शिष्टमंडळ सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांची भेट घेऊन मच्छीमारांच्या समस्या मांडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हंगामाचा पहिलाच दिवस असल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने चांगले काम करावे, यासाठी अधिकार्‍यांचा सन्मान करण्यासाठी पुष्पहार सोबत आणला होता. मात्र प्रमुख अधिकारीच नसल्याने आणि त्यांचे कक्ष बंद असल्याने मच्छीमारांनी आणलेला पुष्पहार थेट त्यांच्या कक्षाला घालून निषेध नोंदविला. मच्छीमारांनी एक निवेदनही मत्स्य व्यवसाय विभागाला देत काही मागण्या केल्या आहेत. 15 ऑगस्टपर्यंत गस्तीनौका तैनात न करण्यात आल्यास मत्स्य व्यवसाय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

मत्स्य व्यवसाय मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असल्याने मत्स्य व्यवसाय कार्यालयात 100 टक्के कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती असणे आवश्यक आहे. मात्र याठिकाणी मंजूर 32 पदांपैकी फक्त 14 पदे भरलेली आहेत. पन्नास टक्केही कर्मचारी याठिकाणी नसल्याने कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून दक्षतेने कार्यवाही होण्याची शक्यताच कमी आहे. पालकमंत्री आपले असूनही याठिकाणी कर्मचारी नाही हे आमचे दुदैव आहे. कर्मचारीच मंत्री आणू शकत नाही तर मच्छीमारांच्या समस्या सुटणार कधी? मच्छीमार हंगाम सुरू झाला असताना अधिकारी पहिल्याच दिवशी उपस्थित राहणार नाहीत तर कामे होणार कधी? असा संतप्त प्रश्न मच्छीमारांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news