

सावंतवाडी : मंगळवारी सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर गाडी अंगावर घालण्याच्या कारणावरून सावंतवाडी येथे वन विभाग कार्यालय समोरील परिसरात शिवसेना आणि भाजपच्या दोन गटांमध्ये राडा झाला होता. या राडाप्रकरणी दोन्ही गटांतील मिळून शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी देण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी आणि पोलिसांनी स्वतःहून असे मिळून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजपचे युवानेते विशाल परब यांचे चालक अमरीश यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून धक्काबुक्की, मारहाण आणि गाडी अडवल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकपदाचे उमेदवार संजू परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, अॅड. नीता सावंत -कविटकर, नगरसेवक पदाचे उमेदवार अजय गोंदावळे तसेच क्लेटस फर्नांडिस,ज्ञानेश्वर पाटकर,प्रफुल्ल गोंदावळे आदी मिळून 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटकर यांनीही तक्रार दिली असून. या तक्रारीमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अॅड. अनिल निरवडेकर, नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर पोलिसांकडून दाखल गुन्ह्यांमध्ये मनाई आदेश भंग करून पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव करणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे आणि शिवीगाळ करणे या प्रकरणी प्रमुख संशयित शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटकर,क्लेटस फर्नांडिस आणि भाजपाचे कार्यकर्ते अमित परब यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार 2 डिसेंबरला झालेल्या नगरपरिषदेच्या मतदानाच्या वेळेला सावंतवाडी वन कार्यालय परिसरात शिवसेना आणि भाजपाचे दोन गट भिडले होते. गाडी अंगावर घातल्याच्या रागातून हा वाद सुरू झाला. यात भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा चालक अमरीश यादव(रा. चराठे) याला मारहाण करण्यात आली आणि त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलिस स्थानकातही त्यांच्यात बाचाबाची झाली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व डीवायएसपी विनोद कांबळे यांनी उपलब्ध तक्रारी आणि माहितीवरून गुन्हे दाखल केले.
विशाल परब हे भाजप स्थानिक युवा नेते आहेत. ते सावंतवाडीच्या राजकारणात सक्रिय आहेत. राड्याच्या घटनेत त्यांचा थेट सहभाग नसला तरी, त्यांचे चालक आणि त्यांच्या गाडीभोवती ही घटना घडली.विशाल परब यांचे चालक अमरीश यादव यांनी पहिली तक्रार पोलीस ठाण्यात दिली, ज्यानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, नीता कविटकर, अजय गोंदावळे यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल झाला. तक्रारीनुसार, संजू परब यांच्या गटातील लोकांनी अमरीश यादव (चालक) यांना मारहाण केली आणि त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याने सावंतवाडी शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. धुमश्चक्रीच्या घटनेनंतर शहराची शांतता बिघडू नये, यासाठी शिवसेनेने संयमाची भूमिका घेत कोणतीही तक्रार दाखल न करण्याचा निर्णय शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घेऊन ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र विशाल परब यांच्या चालकाने तक्रार दिल्यानंत शिंदे शिवसेनेनेही सावंतवाडी पोलिसांत तक्रार दिली.